बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज मल्टीपर्पज ग्राउंडवर इव्हेंटचे अतिक्रमण; वॉकिंग करणाऱ्या नागरिकांची गैरसोय 

Beed

नगरपरिषदेच्या हलगर्जीपणामुळे शिवाजी महाराज मल्टीपर्पज ग्राउंड कचऱ्याच्या विळख्यात

बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज मल्टीपर्पज ग्राउंडवर इव्हेंटचे अतिक्रमण; वॉकिंग करणाऱ्या नागरिकांची गैरसोय 

बीड प्रतिनिधी 

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मल्टीपर्पज ग्राउंड नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक आणि ओपन जिमच्या स्वरूपात लाखो रुपये खर्चून विकसित करण्यात आले आहे. मात्र, सध्या हे ग्राउंड नागरिकांच्या आरोग्याचा विचार न करता केवळ इव्हेंट ग्राउंड म्हणून वापरण्यात येत असल्याची जोरदार चर्चा आहे. नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या दुर्लक्षामुळे आणि स्वार्थी भूमिकेमुळे या ठिकाणी सातत्याने मोठे कार्यक्रम घेतले जात आहेत. परिणामी, कार्यक्रम संपल्यानंतर ग्राउंडवर जागोजागी कचऱ्याचे ढिगारे, प्लास्टिक, खाऊ-पिऊच्या वस्तू आणि दुर्गंधीचा साम्राज्य असते. त्यामुळे नियमित वॉकिंगला येणाऱ्या नागरिकांसाठी व महिलांसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे.आरोग्यासाठी विकसित करण्यात आलेले हे ग्राउंड आता नागरिकांसाठी रोगट वातावरण निर्माण करत आहे. त्यामुळे नगरपरिषदेने त्वरित यावर योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व वॉकर्सकडून केली जात आहे. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन ग्राउंडच्या स्वच्छतेसाठी ठोस पावले उचलावीत, अन्यथा याविरोधात नागरिकांना आवाज उठवावा लागेल.

शहरातील मुख्य चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मल्टीपर्पज ग्राउंड वर दररोज सकाळ-संध्याकाळ नागरिक मोठ्या संख्येने वॉकिंग व व्यायामासाठी येतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी वारंवार विविध इव्हेंट आणि राजकीय सभा आयोजित केल्या जात असल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.नगरपरिषदेकडून वैयक्तिक फायद्यासाठी ग्राउंड इव्हेंटसाठी दिले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. महिन्यातून दोन ते तीन वेळा येथे मोठे कार्यक्रम किंवा राजकीय सभा घेतल्या जात असल्याने गर्दी, कचऱ्याचे ढिगारे, अस्वच्छता आणि ध्वनिप्रदूषण होत आहे. त्यामुळे नियमित वॉकिंग करणाऱ्या नागरिकांसाठी आणि वयोवृद्धांसाठी हा मोठा अडथळा ठरत आहे.या संदर्भात नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे याकडे स्वतःच्या फायद्यासाठी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून, ग्राउंड वॉकिंगसाठी आहे की इव्हेंटसाठी? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा प्रकार थांबवावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

 

Sharing

Visitor Counter