साप्ताहिक वृत्तपत्रांच्या संपादकांचे शिष्टमंडळ पालकमंत्री व खासदारांना भेटणार !

साप्ताहिक वृत्तपत्रांच्या संपादकांचे शिष्टमंडळ पालकमंत्री व खासदारांना भेटणार !
दैनिकांच्या संपादकांना ही गळ घालणार ! बीड (प्रतिनिधी)
कोरोना विषाणूच्या महामारी मुळे निर्माण झालेल्या अवस्थेतून मार्ग काढण्यासाठी साप्ताहिक वृत्तपत्रांच्या संपादकांचे शिष्टमंडळ लवकरच जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे व जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना भेटणार असल्याचे सा.द स्कुल एक्सप्रेस चे संपादक शेख एजाज़ आणि सा.अल्-मरकज़ टाइम्स चे संपादक एस.एम. युसूफ़ यांनी दिलेल्या पत्रकात नमूद केले असून याकरिता सर्व स्थानिक वृत्तपत्रांच्या संपादकांना ही गळ घालणार असल्याचे म्हटले आहे. पत्रकात नमूद केले आहे की, केंद्र शासन आणि राज्य शासनाने मिळून देशात व राज्यात लॉक डाऊन केलेले आहे. याला आता दोन आठवड्याचा कालावधी उलटला आहे. तसेच देशाच्या पंतप्रधानांनी 14 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन राहणार असल्याचे स्पष्ट केलेले आहे. लॉक डाऊन च्या गेल्या पंधरवड्यातच साप्ताहिक वृत्तपत्रांची अवस्था बिकट झाली असून इच्छा असूनही वृत्तपत्रे काढता आलेली नाहीत. आर्थिक व्यवहार पार कोलमडून गेले आहेत.
14 एप्रिल पर्यंत लॉक डाउन असल्याचे घोषित जरी केले असले तरी आपल्या जिल्ह्याच्या जवळपास असणारे इतर जिल्ह्यात कोरोना विषाणूचे संसर्ग झालेले लोक मिळून येत असल्याने तसेच राज्यात पुणे आणि मुंबई सारख्या महानगरांमध्ये दर दिवशी वाढत जाणारी कोरोना विषाणू बाधित लोकांची संख्या पाहता लॉक डाऊन चा जाहीर केलेला कालावधी हा तोकडा वाटत आहे. जर पुढे चालून हा कालावधी वाढवावा लागला तर याची स्पष्ट माहितीसुद्धा केंद्र आणि राज्य शासनासह देशभरातील कुठलेही प्रशासन देण्यास सक्षम असल्याचे दिसून येत नाहीत. एकंदरीत निर्माण झालेली अवस्था ही प्रत्येक क्षेत्राला आर्थिक दृष्ट्या डबघाई कडे घेऊन जाणारी ठरत आहे. यातून वृत्तपत्र क्षेत्रही सुटलेले नाही. वृत्तपत्रे मग ती दैनिके असो की साप्ताहिके चालविण्यासाठी संपादकांना मोठी कसरत करत अग्निदिव्यातून जावे लागते. त्यातूनच समोर आलेला हा कोरोना विषाणू वृत्तपत्र क्षेत्राच्या मुळावर आल्याचे दिसून येत आहे.
अनेक वृत्तपत्रे छापून प्रकाशित करायची बंद झालेली आहेत. तर काही वृत्तपत्रे छपाई न करता फक्त संगणकावर तयार करून व्हाट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून पाठविली जात आहेत. मात्र हेसुद्धा फक्त निवडक संपादक मंडळीच करू शकत आहे. सरसकट संपादक अशाप्रकारे वृत्तपत्रे चालवू शकत नाहीत. या अशा बिकट अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी अन्य क्षेत्रांसारखेच आता वृत्तपत्र क्षेत्रही मोठ्या आशेने मायबाप शासनाकडे पाहत आहे. यामुळेच शासनाचे शिलेदार आणि जनतेचे प्रतिनिधी म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्याकडे साप्ताहिक वृत्तपत्रांच्या संपादकांचे शिष्टमंडळ लवकरच जाणार असून कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी, शासनाकडून आर्थिक पॅकेज मिळवून देण्याची मागणी करण्यात येणार आहे.
जोपर्यंत परिस्थिती पूर्ववत होत नाही आणि वृत्तपत्र प्रकाशित करण्यास वाव मिळत नाही, तोपर्यंतच्या कालावधीसाठी शासनाने वृत्तपत्रांना सढळ हस्ते आर्थिक पॅकेज द्यावा. जेणेकरून दैनिकांसह शासनाच्या यादीवर असलेली साप्ताहिके ही तग धरतील अन्यथा साप्ताहिके चालविणाऱ्या संपादकांचे कंबरडे मोडून जाईल. वृत्तपत्रे बंद करण्याची वेळ येईल. लोकशाहीच्या चौथ्या आधार स्तंभाची आर्थिक विवंचनेत ससेहोलपट होऊ नये. म्हणून पालकमंत्री आणि खासदारांची भेट घ्यायची आहे.
यामध्ये साप्ताहिक वृत्तपत्रांचे मोठे भाऊ असलेल्या दैनिक वृत्तपत्रांच्या संपादकांचे पाठबळही घेण्यात येणार आहे. स्थानिक दैनिकांच्या संपादकांना याविषयी गळ घालण्यात येणार आहे. ज्यामध्ये दैनिक चंपावतीपत्र चे ज्येष्ठ संपादक नामदेवराव क्षीरसागर, दै. पार्श्वभूमीचे गम्मत भाऊ भंडारी, दै. रणझुंजार चे आगवान मामा, दै. झुंजार नेता चे अजित जी वरपे, दै. लोकाशा चे विजयराज जी बंब, दै. लोकप्रश्न चे दिलीप जी खिस्ती, दै. सुराज्य चे सर्वोत्तम जी गावरस्कर, दै. संकेत चे नरेंद्रजी कांकरीया, दै. हिंद जागृती चे अभिमन्यू घरत, दै. कार्यारंभ चे शिवाजीराव रांजवण पाटील, दै. युवा सोबती चे इसाक अहमद सेठ, दै. रिपोर्टर चे शेख तय्यब, दै. आमचा अभिमान चे राजेंद्रजी होळकर, दै. सिटीझन चे शेख मुजीब, आणि अन्य दैनिकांच्या संपादकांची ही भेट घेऊन यादीवर असलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांसमोर निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी या सर्व ज्येष्ठ संपादकांना सुद्धा गळ घालण्यात येणार आहे.
शेवटी दैनिक वृत्तपत्रे व त्यांचे संपादक हे साप्ताहिक वृत्तपत्रे आणि त्यांच्या संपादकांचे मोठे भाऊ आहेत. आणि आम्ही त्यांचे लहान भाऊ आहोत. आज लहान भावांवर मोठी आर्थिक बिकट परिस्थिती आलेली आहे. शिवाय मोठे भाऊ सुद्धा यातून सुटलेले नाही. म्हणून दोघांनी मिळून शासनाकडे वृत्तपत्र क्षेत्रासाठी आर्थिक पॅकेज ची मागणी लावून धरली तर निश्चितपणे याचे फळ आपल्याला चांगले मिळतील. असे भावनिक उद्गार ही पत्रकात शेख एजाज़ आणि एस.एम. युसूफ़ यांनी नमूद केले आहे.








