शालार्थ मंजुरीचा गौडबंगाल!

शालार्थ मंजुरीचा गौडबंगाल!
अंबाजोगाईतील मुख्याध्यापकाच्या बहिणीची लातूरची सिनिऑरिटी दाखवत धारूरमध्ये नियुक्ती व शालार्थ आयडी?
टीईटी घोटाळ्यातील परळी-धारूर शिक्षकांचे त्या उर्दू शिक्षण संस्थेमध्ये शालार्थ आयडी निघाले कसे?
कोरोनाच्या कडक लॉकडाऊन मध्ये एप्रोवल निघतो कसा?
बीड प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील एका अल्पसंख्याक शिक्षण संस्थेच्या परळी व धारूर येथील शाखांमधील काही शिक्षकांच्या शालार्थ आयडी मंजुरी प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित शिक्षकांचे शालार्थ आयडी नेमके कोणत्या आधारावर आणि कोणत्या प्रक्रियेनुसार मंजूर करण्यात आले, याबाबत शिक्षण विभागाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी होत आहे.
तसेच, एका शिक्षिकेची पूर्वीची सेवा ग्राह्य धरून लातूरमधील संस्थेतून बदली झाल्याचे दाखवत मागील कालावधीची सेवा नोंदवून शालार्थ आयडी काढण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. या प्रक्रियेत सर्व नियमांचे पालन झाले का, याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणीही होत आहे.
याशिवाय, संबंधित शिक्षकांकडे आवश्यक पात्रता होती का, हा देखील चर्चेचा विषय ठरत आहे. सीटीईटी (CTET) पात्र उमेदवारांना शालार्थ आयडी मंजूर होणे समजू शकते; मात्र टीईटी संदर्भातील वाद किंवा प्रकरणांशी संबंधित असल्याचा आरोप असलेल्या व्यक्तींना शालार्थ आयडी कशाच्या आधारे देण्यात आले, असा सवाल उपस्थित केला जात आहे. अल्पसंख्याक संस्थांमध्ये टीईटीची अट लागू होण्याबाबत न्यायालयीन निर्णय आणि कायदेशीर स्थिती वेगळी असू शकते, त्यामुळे प्रत्येक प्रकरणातील नियमांची पडताळणी आवश्यक आहे.
दरम्यान, संबंधित उर्दू शिक्षण संस्थेत एकूण किती शिक्षकांची भरती करण्यात आली, त्या भरतीसाठी कोणती प्रक्रिया राबविण्यात आली आणि शालार्थ आयडी मंजुरीसाठी कोणती कागदपत्रे सादर करण्यात आली, याची माहिती सार्वजनिक करण्याची मागणीही होत आहे.या सर्व आरोपांची अधिकृत चौकशी होऊन वस्तुस्थिती समोर यावी आणि दोषी आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
चौकट
बीड येथील अल्पसंख्याक संस्थेची शाखा अंबाजोगाई येथे आहे. अंबाजोगाई येथील उर्दू शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक यांनी आपल्या सख्ख्या बहिणीला लातूर येथील बंद पडलेल्या संस्थेत कार्यरत असल्याचे दाखवून तिची ज्येष्ठता (सिनिऑरिटी) निश्चित केली. त्यानंतर त्या ज्येष्ठतेच्या आधारे तिची धारूर येथील उर्दू शिक्षण संस्थेत नियुक्तीचा आदेश काढण्यात आला.
चौकट...
बीड येथील अल्पसंख्याक संस्थेच्या परळी येथील शाखेत टीईटी घोटाळ्यातील शिक्षकांचे शालार्थ आयडी कसे आणि कोणाच्या परवानगीने काढण्यात आले?कोरोनाचा काळ आणि कडक लॉकडाऊन सुरू असतानाही शिक्षकांचे मंजुरी प्रस्ताव (अॅप्रूव्हल) काढण्यात आले. तेवढ्यावरच न थांबता, टीईटी घोटाळ्यात नाव असलेल्या शिक्षकांनाही शालार्थ आयडी देण्यात आली. हा निर्णय नेमका कुणी घेतला आणि कोणाच्या आदेशावर ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली? या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
चौकट...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील शालार्थ आयडी देण्याची जबाबदारी असलेल्या संबंधित कर्मचाऱ्याला संपूर्ण प्रकरणाची माहिती असूनही शासनाची दिशाभूल करून टीईटी घोटाळ्यातील शिक्षकांचे शालार्थ आयडी काढण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. तसेच, या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचीही चर्चा असून, या सर्व प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याची गरज आहे.








