गेवराई शहरातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विशेष मोहिम--जिल्हाधिकारी राहुल रेखावार

गेवराई शहरातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विशेष मोहिम--जिल्हाधिकारी राहुल रेखावार
बीड/प्रतिनिधी
गेवराई शहरातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्याच्या अनुषंगाने विशेष मोहिम राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत
यामध्ये संसर्ग आणखी कमी करण्यासाठी भीलवाडा पॅटर्न प्रमाणे गेवराई शहरातील व्यक्ती जे रोज मोठ्या प्रमाणावर लोकांच्या संपर्कात येत असतात(सुपर स्प्रेडर्स) यांची तपासणी करण्यात येणार आहे
गेवराई शहरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव थांबविण्यासाठी आजपर्यंत नागरीकांनी मोठ्या प्रमाणात नियमांचे पालन केले आहे. सध्या शहरातील वाढता प्रादुर्भाव थांबविण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणावर दैनंदिन सर्वेक्षण चालू आहे
आणि त्यातून अनेक संसर्ग झालेले रुग्ण संसर्गाचे गंभीर परिणाम होण्याआधीच रुग्णालयात दाखल करण्यात आणि पर्यायाने होणाऱ्या मृत्युंची संख्या कमी करण्यात खूप मदत होत आहे. परंतु सदरील संसर्ग आणखी कमी करण आवश्यक आहे.
यामुळे सदर मोहिमेत खालील उपाय योजना करण्यात येणार आहेत
1. दि .05 व 06 ऑगस्ट रोजी गेवराई शहरातील सर्व प्रकारच्या दुकानदारांचे, फळ-भाजी विक्रेत्यांचे, दूध विक्रेते, पेट्रोलपंपावरील व बँकामधील कर्मचारी यांचे कोरोनाचे Antigen Test ने तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
2. सदरील सर्व नियोजन दुकानदार, पेट्रोल पंप चालक व बँकांच्या मदतीनेच करण्यात आले आहे. शहरातील दूध विक्रेत्यांनी नगरपालिकेच्या स्वच्छता निरिक्षकांद्वारे नेमलेल्या ठिकाणी तपासणीसाठी जायचे आहे आणि शहराबाहेरून येणाऱ्या दूध
विक्रेत्यांची तपासणी त्यांच्या गांवच्या ग्रामसेवकांनी त्यांना दिलेल्या ठिकाणी शहरातच करण्यात येणार आहे.
3. सर्व प्रकारच्या दुकानदारांच्या संघटनांनी (किराणा, कपडे, सराफा इ.सर्व) त्यांच्या सर्व सदस्यांची यादी, फोन नंबर सह दिलेली आहे. तरीही जे दुकानदार त्यांच्या संघटनेचे सदस्य नाहीत त्यांनी त्यांच्या व्यवसाया संबंधित नियुक्त प्रतिनिधींना फोन करुन आपले नांव केवळ या तपासणीच्या कामासाठी दि .04.08.2020 पर्यंत नोंदवावे लागणार आहे.
4. या नोंदणीनंतर प्रत्येकाला एक स्थळ आणि वेळ संघटनेमार्फत कळविण्यात येईल. बरोबर त्याच वेळी प्रत्येक दुकानदाराने तपासणी साठी यावे. त्याच ठिकाणी एका तासातच तपासणीचा निर्णय दुकानदारांना कळविण्यात येईल. संपूर्ण प्रक्रिया ही कोठेही गर्दी न होता आणि कोविड विषयक सर्व काळजी घेऊन करण्यात येणार आहे.
5. तसेच या मोहीमेनंतर तपासणी झालेल्या दुकानांनाच दुकान उघडण्याची परवानगी राहील परंतु कोणत्याही दुकानदाराने अशी कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नये आणि संपूर्ण सहकार्य करावे व सर्व दुकानदारांनी आवर्जुन आपली तपासणी करुन घ्यावी. या तपासणीद्वारे आपण केवळ स्वत: लाच नाही तर आपल्या परिवाराला, घरातील वृद्ध व मुलांना आणि आपल्या दुकानातील कर्मचाऱ्यांना व त्यांच्या परिवारांना सुद्धा सुरक्षित ठेवण्यास मदत होणार आहे
गेवराई शहरातील कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यास नागरिकांनी व प्रशासनास मदत करावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे, व त्यातील पोट कलम 2 (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत.
तसेच बीड जिल्हयात फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम १४४(१) (३) अन्वये दिनांक ३१ जुलै २०२० रोजीचे रात्री १२.०० वा. पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत, सदर आदेश या आदेशासह अंमलात राहतील.








