जिल्हा नियोजन बैठक

दि. ०७ एप्रिल २०२० आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीत शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ विनायकराव मेटे यांच्या सूचनेवरून त्यांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे व युवक जिल्हाध्यक्ष रामहरी भैय्या मेटे यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्नांसंदर्भात उपाययोजना करण्यात याव्या ही मागणी केली. खाली यातील काही मागण्या दिलेल्या आहेत...
1) कोरोनाचा सामना करण्यासाठी डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी यांना आवश्यक असणार्या साधनांचा तुटवडा असल्याचे कळते असून याबाबत तत्काळ तोडगा काढत आवश्यक ते साहित्य पुरवायला हवे.
२) बीड जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक संख्येने लोक परतले आहेत. सध्यातरी जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही हि समाधानाची बाब आहे. मात्र जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लोक आडमार्गांचा वापर करून येत असल्याचे कळत आहे. हे थांबवले पाहिजे जेणेकरून जिल्हा कोरोनाच्या प्रभावापासून दूर राहील.
३) जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी उसतोड कामगार व शहरातील मजूर काही दिवसांपूर्वी सुरक्षित स्थळी क्वारंटाईन केले गेले आहेत. मात्र या लोकांना अद्यापपर्यंत मुलभूत सुविधा पुरवल्या गेल्याचे निदर्शनास आलेले आहे. यामध्ये साबण, सनीटायझर, टूथपेस्ट, लहान मुलांना दुध अशा गोष्टी दिल्या गेल्या नाहीत. जो आहार दिला जातो तो या कामगारांच्या भुकेइतकाही दिला जात नसल्याचे आढळून आले असून तशा तक्रारी या कामगारांच्या आहेत. बीड शहराच्या नजीक असूनही शासकीय तंत्रनिकेतन, सैनिकी शाळा, पाली, यशवंतराव चव्हाण तंत्रनिकेतन, मां जिजाऊ पब्लिक स्कूल आदी ठिकाणच्या कामगार व मजुरांना जीवनावश्यक साहित्यांची आवश्यकता आहे.
४) जिल्ह्याच्या बाहेरच अडकलेल्या उसतोड कामगारांसाठी आहे तेथेच जीवनावश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न शासन स्तरावर सुरु आहेत मात्र हे तोडके पडत असून सदर उसतोड कामगारांना आवश्यक असणारे अन्नधान्य व जीवनावश्यक साहित्य संपत चालले असूनही तेथे त्यांना शासनस्तरावर मदत मिळत नाही. जसे कि माळेगाव ता बारामती येथील सहकारी साखर कारखाना परिसरात पिंपळनेर, नाळवंडी, वडवणी भागातील हजारो उसतोड कामगार कारखाना परिसरात असून तेथे त्यांना अद्याप मदत मिळालेली नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत.
५) राशनमधील काळ्याबाजार प्रकरणी गोदामावर धाड टाकत जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचे अभिनंदन करण्यात येत आहे. मात्र एवढ्यावर न थांबता या काळ्याबाजारातील काही अजून घटक बाकी आहेत. पुरवठा विभाग ते राशन वाटप करणारे दुकानदार यांच्यापर्यंत काळा बाजार करणाऱ्यांविरुद्ध अजूनही कडक कारवाई आवश्यक आहेत. गोरगरिबांना त्यांच्या हक्काचे राशन या महामारीच्या वेळेस मिळणे आवश्यक असून लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ यायला नाही पाहिजे. सोबतच ज्यांचे नाव राशन यादीत नाही, शिधापत्रिका नाही अशा राशनची गरज असलेल्या गरजूंना राशन द्यायला हवे.
६) जिल्ह्यात बर्याच ठिकाणी राशन वाटपात राशन दुकानदारांकडून काळाबाजार केला जात असल्याने नागरिक तक्रार करतात मात्र तक्रारीनंतर या दुकानदारांकडून मारहाण केली जात असल्याचे समोर येत आहे. हे प्रकार थांबायला हवेत. काळाबाजार करणाऱ्या अशा दुकानदारांवर कडक कारवाई करायला हवी.
७) लॉकडाऊन कोरोना महामारी संपविण्यासाठी आवश्यकच आहे मात्र याच्या कडक अंमलबजावणीमद्ध्ये उपासमारीची समस्या समोर येत आहे. बीड तालुक्यातील काळेगाव हवेली येथील रामेश्वर पवार नामक अपंग असलेला युवक पुण्यात कंपनीस कामाला होता. त्याच्याकडील अन्नधान्य संपल्यानंतर त्याला पायी बीडकडे यावे लागले. त्याला मदत तर बाजूलाच राहिले आहे ती रक्कम चोरट्यांनी मारहाण करत काढून घेतली गेली. भुकेने व्याकूळ झालेल्या रामेश्वरचा मृतदेह शिरूर(पुणे) नजीक रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत आढळून आला. चित्रकार असलेल्या या युवकाचे कुटुंब उघड्यावर आले असून त्यांना शासनस्तरावर आधार देण्यात यावा. तसेच अन्नाधाण्याविना भुकेने कुणी उपाशी राहू नये यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करावेत.
8) लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीस आणताना कसलेही ओळखपत्र नसल्यामुळे पोलिसांकडून त्रास दिला गेल्याच्या बर्याच घटना घडल्या आहेत. शेतकऱ्यांना इंधनही पेट्रोल पंपावर मिळत नाही. यासाठी उपाययोजना व्हायला हव्यात.
९) पोलीस जिल्हा सीमेवर बाहेरून येणाऱ्या लोकांची तपासणी व त्यांना थांबवण्याचे काम करतात. तबलिगी जमातीत सहभागी झालेले काही कोरोनाबाधित बीड जिल्ह्याच्या सीमेवर आल्यानंतर त्यांनी पोलिसांशी प्रवेशासाठी हुज्जत घातली होती. यानंतर सर्व पोलिसांची तपासणी करावी लागली. येणारी व्यक्ती हि कोरोनाबाधित आहे कि नाही याची कल्पना पोलीस कर्मचार्यांना नसते. निव्वळ एका मास्कवर पोलीस कर्मचारी सुरक्षितता होते हे वादतीत असून सीमेवर असलेल्या पोलिसांना कोरोनापासून सुरक्षा देणारी कीट देणे आवश्यक आहे.
१०) सध्या रब्बीच्या पिकांचे सिंचन सुरु आहे. मात्र विद्युत पुरवठा हा अत्यंत कमी दाबाचा असल्याने शेतीतील विद्युतपंप सुरु देखील होऊ शकत नाहीत. हा विद्युत पुरवठा दाब वाढावायला पाहिजे.
११) ३० ते ४०% शेतकऱ्यांचा कापूस अद्याप विक्री करायचा बाकी आहे. लॉकडाऊन संपताच हा कापूस खरेदी केला जावा.
१२) मास्क लावणे हे अनिवार्य करण्यात यावे व जो हा नियम पळणार नाही त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. जेणेकरून हि महामारी आटोक्यात आणता येईल.
१३) ग्राउंड रिपोर्टिंग करणाऱ्या नोंदणीकृत वृत्तवाहिन्या, दैनिके यांच्या एका प्रतिनिधीस कोरोनापासून संरक्षण करणारी कीट शासनाच्या वतीने देण्यात यावी.
१४) शिथिलतेचा वेळ कमी करून अत्यावश्यक साहित्याच्या खरेदीसाठी कुटुंबातील एकाच व्यक्तीने बाहेर पडावे व त्याच्यासाठी लागणारा पास देणे शक्य असेल तर द्याण्यात यावा.
१५) स्वच्छता, पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा व राशन दुकानदारांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्यात याव्यात.








