वाघ्या -मुरळी परिषदेतर्फे तहसीलदार यांना निवेदन

वाघ्या -मुरळी परिषदेतर्फे तहसीलदार यांना निवेदन
गेवराई/प्रतिनिधी
आज दि. ६-( वार्ताहर ) येथील तहसीलदार सुहास हजारे यांना वाघ्या -मुरळी परिषद बीड यांच्या वतीने वाघ्या -मुरळी कलावंतांच्या विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले .
वाघ्या - मुरळी लोककलावंत अनादीकाळापासून कलेच्या माध्यमातून धर्मजागरण ,कुळधर्म -कुळाचार पालन करीत आहेत . समाज प्रबोधनाद्वारे समाजसेवेचे कार्य करीत आहेत. समाजातील भाविक भक्तांच्या आश्रयावर लोक कलाकारांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असतो .मात्र मागील वर्षीची अतिवृष्टी , त्यानंतरची निवडणूक आचारसंहिता आणि मार्च 2020 पासून चालू असलेले कोरोना लॉकडाऊन यामुळे वाघ्या -मुरळी कलावंतांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे .ही कला जपली पाहिजे , वाढली पाहिजे यासाठी सरकारने आमच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मागण्या मान्य कराव्यात ,अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे . निवेदनामध्ये १ ) वाघ्या -मुरळी कलावंतांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी विशेष निधी स्वरूपात मंजूर करावा , २ ) या कलावंताच्या मुला -मुलींच्या शिक्षणाचा खर्च शासनामार्फत करण्यात यावा .३ ) वाघ्या मुरळी कलावंतांना शासन दरबारी अधिकृत मान्यता मिळून त्यांची नोंदणी करण्यात यावी .४ ) वाघ्या - मुरळी कलावंतांना जमीन -घर या स्वरूपात विशेष योजना मंजूर करावी , ५ ) या कलावंतांना कायमस्वरूपी पेन्शन योजना सुरू करावी .६ ) वाघ्या - मुरळी यासाठी स्वतंत्र वाघ्या - मुरळी लोककलावंत आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे , ७ )सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन करून वाघ्या -मुरळी लोककलावंतांना कुलाचाराचे कार्यक्रम करण्याची परवानगी द्यावी .८ ) बंद असलेली देवालये, मंदिरे , राऊळे खुली करावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत . निवेदन माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, तहसीलदार सुहास हजारे, गटविकास अधिकारी अनिरूध्द सानप यांना देण्यात आले. निवेदनाच्या प्रती मा. मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, सांस्कृतिक मंत्री यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. सोबत प्रत्येकाला या लोककलावंतांची आठवण राहावी म्हणून बेल भंडाराही पाठविण्यात आला आहे.यावेळी जेष्ठ कलावंत आत्माराम करपे मामा, विठ्ठलराव हाप्टे,अंबादास सातपुते, राजाभाऊ तलवाडे,बंडू पवार, कैलास टोणपे ,माऊली चव्हाण अमोल कांबळे नितीन वंजारी साई सूर्यवंशी आदि वाघ्या मुरळी कलावंत उपस्थित होते.








