मुहम्मदीया कॉलनीत आवश्यक असलेले 121 विद्युत खांब लावा अन्यथा निदर्शने करण्यात येईल - सय्यद इलयास

मुहम्मदीया कॉलनीत आवश्यक असलेले 121 विद्युत खांब लावा अन्यथा निदर्शने करण्यात येईल - सय्यद इलयास
बीड/प्रतिनिधी
शहरातील मुहम्मदीया कॉलनीतील रहिवासी तथा ए.आय.एम.आय. एम.पक्षाचे युवानेते सय्यद इलयास यांनी दिलेल्या पत्रकातून महावितरण कंपनीला इशारा देताना म्हटले आहे की, 121 विद्युत खांब लवकरात लवकर लावा. अन्यथा महावितरण कंपनी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात येईल.
दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, मुहम्मदीया कॉलनीतील अंधार दूर करण्यासाठी सन 2015 पासून महावितरण कंपनी च्या कार्यालयासह बीड नगर परिषद कार्यालयात सुद्धा आतापर्यंत 31 जानेवारी 2015, 26 मार्च 2015, 28 मे 2015, 11 नोव्हेंबर 2015, 11 जानेवारी 2016, 5 सप्टेंबर 2018 अशाप्रकारे आतापर्यंत निवेदने दिलेली आहेत. तरीही आतापर्यंत महावितरण कंपनी आणि बीड नगर परिषद यांनी हवी त्याप्रमाणात नोंद घेतलेली नाही. याचाच परिपाक म्हणून जिथे या भागात सव्वाशे विद्यूत खांब अतिआवश्यक आहे तिथे काही दिवसापूर्वी फक्त तीन-चार पोल लावून मुहम्मदीया कॉलनीतील रहिवाशांची बोळवण करण्यात आलेली आहे. हा येथील रहिवाशांवर अन्याय आहे. विशेष म्हणजे आवश्यक असलेल्या संख्येत विद्युत खांब न लावता, आहे त्या एकेका खांबावरून जवळपास तीस-तीस घरांना कनेक्शन देण्यात आलेले आहे. यामुळे खांबांवर अतिरिक्त लोड येऊन या प्रभागातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो. परंतु याचे कुठलेही सोयरसुतक महावितरण कंपनी आणि बीड नगरपरिषदेला नाही. मात्र येथील रहिवाशांकडून दोन ते तीन महिन्याचे विद्युत बिल जरी थकले तरी महावितरण कंपनी विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी ग्राहकांच्या घरी येऊन धडकते व वीज कनेक्शन कापून टाकण्यात येतो. याबाबत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडे काही तक्रार केली तर ते अरेरावीची भाषा करतात. तसेच विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू करण्यासाठी ग्राहकांकडून दंडाची रक्कम वसूल करण्यात येते. ग्राहकांना सेवा देताना हलगर्जीपणा, मात्र दंड वसूल करताना तत्परता दाखविणारी महावितरण कंपनीने या प्रभागात आवश्यक असलेले अजून 121 विद्युत खांब लवकरात लवकर लावावे. अन्यथा लवकरच महावितरण कंपनी कार्यालयाच्या बाहेर निदर्शने करण्यात येतील. असा इशाराही ए. आय.एम.आय.एम.चे युवा नेते सय्यद इलयास यांनी दिलेल्या पत्रकातून दिला आहे.








