कोरोनामुळे बळी गेलेल्या राज्यातील पत्रकारांना पन्नास लाख रुपयांची मदत करा

Beed

कोरोनामुळे बळी गेलेल्या राज्यातील पत्रकारांना पन्नास लाख रुपयांची मदत करा

किल्लेधारुर तालुका पत्रकार संघाचे तहसीलदारांना निवेदन. 

किल्लेधारूर/प्रतिनिधी

कोविड काळात महाराष्ट्रातील पत्रकारांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कोरोना संदर्भात वृत्त संकलन करण्यासाठी गेलेल्या पाचशेपेक्षा जास्त पत्रकारांना कोरोनाची लागण झालेली आहे. तर पंचवीस पत्रकारांचे यामध्ये बळी गेले आहेत. या पत्रकारांना कोरणा योद्धे म्हणून पन्नास लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी किल्लेधारूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

 महाराष्ट्रात कोरोनाच संकट अधिक उग्र आणि व्यापक झालेलं आहे. माध्यम क्षेत्र देखील त्यापासून अलिप्त झालेले नाही. पाचशेपेक्षा जास्त पत्रकारांना कोरोनाची लागण झालेली आहे. ५० च्या जवळपास पत्रकारांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, आणि कोरोनामुळे २५ पत्रकारांचे बळी गेले आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुलढाणा येथील एका कार्यक्रमात बोलताना पत्रकार हे कोरोना योद्धे असून कोरोनामुळे पत्रकाराचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना पन्नास लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली होती. मात्र कोरोनानं २५ पत्रकारांचे बळी गेल्यानंतर देखील एकाही पत्रकाराच्या नातेवाईकांना सरकारकडून मदत मिळाली नाही. सरकारने घोषणा केल्याप्रमाणे दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबियांना तातडीने ५० लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी, पुणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना विमा योजनेचे कवच दिले जाईल आणि त्याबाबतचा निर्णय पुढील कॅबिनेटमध्ये घेतला जाईल असे स्पष्ट केले होते. या गोष्टीला पंधरा दिवस झाले असून परंतु बाबतचा निर्णय अद्यापही झालेला नाही. माथेरानचे संतोष पवार किंवा पुण्याचे पांडुरंग रायकर यांचा मृत्यू त्यांना वेळीच योग्य उपचार न मिळाल्याने झाला आहे. पुन्हा अशी वेळ येऊ नये यासाठी पत्रकारांना अग्रक्रमाने बेड, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपलब्ध होईल अशी व्यवस्था व्हावी आणि त्यासंबंधीचा अध्यादेश लगेच काढला जावा. पांडुरंग रायकर आणि संतोष पवार यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि माहिती आणि जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिले होते. त्यानुसार पुणे आणि रायगड सिव्हिल सर्जन यांना चौकशी करण्यास सांगण्यात आले होते. या चौकशीचे काय झाले ते समजले नाही. दोन्ही पत्रकारांच्या मृत्यूस जे जबाबदार आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. वरील मागण्यांची सरकारकडून दखल घेतली न गेल्याने आपल्या वेदना व्यक्त करण्यासाठी शुक्रवार दि.१८ सप्टेंबर रोजी राज्यातील पत्रकारांच्या वतीने जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी निवेदन देण्यात येत आहेत.  तसेच अडचणीत आलेले माध्यम क्षेत्र आणि असंख्य पत्रकारावर आलेली बेकारीची वेळ लक्षात घेऊन वरील सर्व मागण्यांची तातडीने पूर्तता करावी अशी मागणी निवेदनाद्वारे किल्लेधारूर तालुका पत्रकार संघाने तहसीलदार यांच्याकडे केली आहे. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष सय्यद शाकेरअली, तालुकाध्यक्ष महादेव देशमुख, सचिव अतुल शिनगारे, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत देशपांडे, राजाभाऊ बोरगावकर, राम शेळके, रवी गायसमुद्रे, विश्वास शिनगारे आदी पत्रकारांची उपस्थिती होती.

Sharing

Visitor Counter