लॉकडाऊन मध्ये असं काहीतरी !

लॉक डाऊन मध्ये असं काहीतरी !
बीड/प्रतिनिधी
एकल महिला संघटनेच्या कार्यकर्त्या कौशल्या बावणे यांनी आपल्या ओळखीच्या लोकांच्या मदतीने गावातून शेतकरी कुटुंबातील महिलांच्याकडून भाकरी जमा करून बीड शहरात अत्यंत गरजवंत महिलांना एका दिवशी ६०० भाकरी मिळवून दिल्या. पण भाकरी देण्याच्या कामात काही आव्हाने येत होती. जर एखाद्या कुटुंबाला एक दिवस भाकरी मिळाली तरी ती दुसऱ्या दिवशी शिळी होते आणि अन्न जपून वापरण्यावर मर्यादा येतात. हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्यांच्या संघटनेतील मैत्रिणी, सहकारी यांच्यासोबत चर्चा केली. आपण भाकरी जमा करून मदत करण्याच्या ऐवजी धान्य जमा करून त्याचे कीट करून वाटप केले तर किमान आठवडा भराची मदत होऊ शकेल, हे लक्षात आले. आपल्या संघटनेतील ज्यांच्याकडे शेती आणि घरात धान्य आहे अश्या सभासदांशी बोलायला सुरुवात केली. त्यांनी बीड तालुक्यातील ढेकणमोहा या गावात महिलांच्या बैठकीत जाण्याच्या अगोदर महिलांच्या सोबत टेलिफोन वरून संवाद केला. त्यामुळे कौशल्याताई गावात जाण्याच्या अगोदर महिलांनी २०० किलो धान्य जमा करून ठेवले. या सर्वांच्या मधून महिलांच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. त्यांनी ते धान्य गरजू महिलांची यादी तयार करून त्यांना वाटप केले.
आतापर्यंत व्यक्तिगत पातळीवर सुरु असलेले हे काम आता सामुहिक व्हायला सुरुवात झाली. एकल महिला संघटनेच्या ज्या इतर लीडर्स आपल्या संघटनेच्या सभासदांच्या सोबत फोनवरून संवाद करत होत्या त्यांनीही आपआपल्या विभागात कॉन्फरन्स कॉलच्या माध्यमातून बैठका घेऊन महिलामध्ये चर्चा घडवून आणली. गावातल्या महिलामंडळाच्या पुढाकारातून धान्य जमा करून गावातील वंचित घटकातील कुटुंबाना असेच धान्यवाटप केले. साधारणपणे २० दिवस ही मोहीम सुरु ठेवली त्यामधून 4,509 किलो धान्य जमा झाले. ही प्रकिया ११ तालुक्यातील ४१ गावातून होतांना पहावयास मिळाली. कुठेही कोणीही न सांगता एकल महिलांनीच पुढाकार घेऊन ह्या मोहिमेचे नेतृत्व केलं.ही माहिती कोरो इंडियाचे कार्यकर्ते राम शेळके यांनी दिली.








