वंचीतांच्या सेवेमुळेच 35 वर्षे नगराध्यक्ष- डॉ.भारतभूषण क्षीरसागर

वंचीतांच्या सेवेमुळेच 35 वर्षे नगराध्यक्ष- डॉ.भारतभूषण क्षीरसागर
जागतिक बेघर दिन;निवारागृहातील निराधारांची भेट घेऊन दिल्या शुभेच्छा; वंचीत महिलांना साड्यांचे वाटप
बीड/प्रतिनिधी
राजकारण आणि समाजकारण करताना तळागाळातील माणसाला प्राधान्याने न्याय द्यायचा हे काकूंनी आम्हाला शिकवले. त्यांच्या विचारांना प्रमाण मानून गोरगरिबांसाठीची शासनाची प्रत्येक योजना खेचून आणली. राज्यातील पहिले बेघर निवारागृह बीडमध्ये उभे केले. धरणी हेच अंथरून आणि आभाळ हेच पांघरून असलेल्या बेघरांना हक्काचा निवारा मिळाला. बेघर, निराधार, वंचीत, उपेक्षीतांची सेवा आणि सेवेतून मिळालेल्या आशिर्वादामुळेच तब्बल 35 वर्षापासून नगराध्यक्ष म्हणून बीडकरांची सेवा करत असल्याचे भावणिक उद्गार नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण यांनी काढले. जागतिक बेघर दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
जागतिक स्तरावर 10 ऑक्टोबर हा दिवस बेघर दिन म्हणून साजरा केला जातो. सन- 2014 मध्ये बीड येथे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी महाराष्ट्रातील पहिले भव्य असे बेघर निवारागृह उभे केले. या निवारागृहात सध्या 60 बेघर आणि निराधार लोक वास्तव्यास आहेत. जागतिक बेघर दिनाचे औचित्या साधून येथील निराधार महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात पुढे बोलताना डॉ. क्षीरसागर म्हणाले की, दिल्ली येथे रक्त गोठवणार्या कडाक्याच्या थंडीत शेकडो लोक रस्त्यावर झोपलेले एका जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्याने पाहिले. पशू, पक्षी अशा प्रत्येक जीवासाठी कायदा आहे. मग बेघर असलेल्या निराधारांसाठी कायदा का नाही? असे म्हणत त्या सामाजिक कार्यकर्त्याने न्यायालयात जनहित याचीका दाखल केली. यावर तात्काळ सुनावणी घेत प्रत्येक राज्याला बेघरांसाठी निवारा गृह उभे करण्याच्या सुचना न्यायालयाने दिल्या. माजी मंत्री जयदत्तअण्णा यांच्या मार्गदर्शनाखी बीड येथे राज्यातील पहिले निवारागृह मंजूर करून घेतले. अधिकार्यांनी निवारागृहासाठी खंडेश्वरी परिसर व शहरातील ईतर ठिकाणच्या अनेक जागा सुचवल्या मात्र मी शहराच्या मध्यवर्ती, सरकारी दवाखाना, बसस्टँड येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या मोक्याच्या जागेवर निवारागृह बांधण्याचा निर्णय घेतला अन सहा महिन्याच्या मराठवाड्यात कुठेही नाही अशी भव्य आणि प्रशस्त जागेवर निवारागृहाची ईमारत उभी केली.
बीडमध्ये सांस्कृतीक चळवळ गतिमान करण्यासाठी भव्य असे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह उभे केले, सिध्दीविनायक कॉम्पलेक्सच्या रूपाने व्यापारी संकुल उभे केले, वातानुकूलीत भाजीमंडई बांधली, पाणी प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी माजलगाव बँक वॉटर आणि आता वाढता विस्तार डोळ्यासमोर ठेवून समांतर पाईपलाईन केली, कोट्यावधीचे दर्जेदार सिंमेंट रस्ते बांधले, अमृत- अटल योजना आणली, ओपन जीम, शहराच्या वैभवात भर घालणारे क्रिडांगण उभे केले. प्रत्येक प्रभागात छोटे छोटे गार्डन उभारले अशी सर्वांगिन विकासाची कामे केलीच मात्र हे करत असताना तळागाळातील आणि वंचीत, उपेक्षीत, निराधार, बेघर अशा घटकांसाठी प्राधान्याने पंतप्रधान घरकुल, कामगार भवन, बेघर निवारागृह अशी अनेक कामे केली. गोरगरिब, निराधार, बेघर, वंचीत लोकांची सातत्याने सेवा केली. या सेवेतून मिळालेल्या अशिर्वादाच्या बळावरच गेल्या 35 वर्षापासून बीडचा नगराध्यक्ष म्हणून जनतेची सेवा करत असल्याचे भावनिक उद्गार त्यांनी काढले. बेघर महिलांसाठी लवकरच स्वतंत्र निवारागृह उभारणार असल्याचे ते शेवटी म्हणाले. यावेळी निवारागृहाचे व्यवस्थापक राजू वंजारे, शालीनी परदेशी, सुधाकर पवार, सामाजिक कार्यकर्त्या सुनिता डोंगरे, रूक्मीणी नागापुरे, अॅनी जोसेफ यांच्यासह बेघर महिला, पुरूष मोठ्या उपस्थित होते. या कार्यक्रमात निराधार महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.








