केज तालुक्यातील पात्र शिधाधारकांना धान्य वाटप

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील पात्र शिधाधारकांना ई-पाँश मशिनद्वारेच, वेळेवर शिधावस्तू वितरीत करण्यात याव्यात, या योजनेपासून एकही वंचित राहु नये ,तसेच पुरवठा विषयक बाबीमध्ये सुसुत्रता व पारदर्शकता यावी यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार केजचे तहसीलदार डी सी मेंढके यांनी कोविड 19,आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत तालुक्यातील 212 स्वस्त धान्य दुकानावर 212 प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती एप्रिल, मे,आणि जून 2020 अशा तीन महिन्यासाठी आहे.
केज तालुक्यातील अंत्योदय ,एपीएल केशरी, शेतकरी लाभार्थी ,उर्वरीत केशरी शिधा पत्रिका धारक लाभार्थी , यांना गहु 2 रुपये,तर तांदुळ 3 रू किलो प्रमाणे मिळणार आहे.तर पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला 5 किलो तांदुळ मोफत मिळणार आहे. या योजनेची पारदर्शक व इमानइतबारे अमलबजावणी व्हावी ,यासाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या आदेशानुसार तहसीलदार डी सी मेंढके यांनी, गटशिक्षणाधिकारी सुनील केंद्रे यांचेकडून शिक्षकांची यादी घेऊन केज तालुक्यातील 212 स्वस्त धान्ये दुकानावर 212 प्राथमिक शिक्षकांची एप्रिल, मे,व जून 2020 या तीन महिन्यासाठी नियुक्ती केली आहे. त्याठिकाणी शिक्षकांनी 13 प्रकारची कामे पार पाडायचे आहेत. यात शिधा पत्रिका धारकांना टोकन देणे, चार ते पाच फुटांचे अंतर ठेवणे , प्रत्येक शिधा पत्रिका धारकाला हात धुण्यासाठी साबण व पाण्याची व्यवस्था दुकानदाराला करायला लावणे, दुकानातील धान्याचे पोते मोजून अहवाल सादर करणे या कामांचा यात समावेश आहे.
2 लाख 16 हजार नागरीकांना लाभ
अंत्योदय,अन्नपुर्णा,एपिएल शेतकरी व इतर योजनेचा लाभ केज तालुक्यातील 48 हजार 914 शिधापत्रिका धारकांना होणार असून एकुण लाभार्थिंची संख्या 2 लाख 16 हजार 816 एवढी आहे.अशि माहिती तहसीलदार डी सी मेंढके यांनी दिली आहे.
आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत कारवाई होणार
केज तालुक्यातील 212 स्वस्त धान्य दुकानावर 212 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून सर्वांनी आपली कामगिरी चोख पार पाडावी. नेमुन दिलेल्या कामात हयगय अथवा दुर्लक्ष केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 56 आणि भादंवि1860 (55) चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र आसलेला अपराध असे मानण्यात येऊन संबंधिता विरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती गटशिक्षणाधिकारी सुनील केंद्रे यांनी दिली.








