शेकटा ग्रामपंचायतीत रोहयोच्या कामात सावळा गोंधळ मयताच्या नावे उचलली कामे न करताच बोगस बिले-जॉबकार्ड, बँक खातेही बनावट

शेकटा ग्रामपंचायतीत रोहयोच्या कामात सावळा गोंधळ मयताच्या नावे उचलली कामे न करताच बोगस बिले-जॉबकार्ड, बँक खातेही बनावट
चकलांबा/वार्ताहर
गेवराई तालुक्यातील शेकटा येथे मजुरांना कामे उपलब्ध करून देण्यासाठी शोषखड्याचे एकुण २३ भाग व वृक्ष लागवडीचे दोन भाग ग्रामपंचायतीने मंजुर करून घेतले होते, मात्र या दोन्ही कामातील दाखवण्यात आलेल्या मजुरांची जॅबकार्ड व बँक खाते बनावट तयार करून बिले उचलण्यात आली असून विशेष बाब म्हणजे यातील १७ मजुर हे मयत असून काही मजुर हे सरकारी नौकरदार आहेत.
शेकटा ग्रामपंचायीतीने मजुरांना कामे उपलब्ध करून देण्यासाठी शोषखड्याचे एकुण २३ भाग व वृक्ष लागवडीचे दोन भाग मंजुर करून घेतले. मजुरांची मागणी नसतांनाही मजुरांच्या परस्पर २६७ मजुरांना शोषखड्याच्या ८ भागाच्या मस्टरवर दर्शविण्यात आले. २६७ मजुरांपैकी १७ मजुर हे आज रोजी मयत आहेत. तसेच ५ मजुर शासकीय नौकरीत कार्यरत आहेत. शोषखड्डा भाग ३ हाजरीपट क्र.३१९७ भाग.४ ह.प.३१९८, भाग-५ ह.प.३६३८ भाग-५ ह.प.३६३७,भाग-८ ह.प.३६५० भाग-६ह.प.३६४०,भाग-७ ह.प.३६३९ या हाजरीपट क्रमांकावरील १९९ मजुरांच्या नावापुढे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा गेवराई हा कोड दर्शविण्यात आला असून बँक खाते त्रयस्त व्यक्तीची असण्याची संभावना आहे. गावात प्रत्यक्ष एकही शोषखड्डा न खोदता बोगस बिले उचलण्याचा सपाटा ग्रामपंचायतीने लावला आहे. झालेल्या अपहाराची चौकशी करण्याबाबत माजी मंत्री बदामराव पंडित यांनी लक्ष घालत बीडिओ, व सिईओ यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे, ग्रामपंचायतीच्या झालेल्या बोगस कामाची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी सुभाष शेंबडे, राजेंद्र महानोर, अजिनाथ महानोर, बाळासाहेब श्रीराम शेंबडे, ज्ञानेश्वर कैलास शेंबडे, विजय शेंबडे, भागेश्वर शेंबडे, सतीष महानोर, अमोल महानोर, सुनिल नागरगोजे, नारायण शेंबडे, परमेश्वर शेंबडे, विठ्ठल शेंबडे, हनुमंत शेंबडेसह आदी ग्रामस्थ व रोजगार मजुरांनी केली आहे. संबंधितांवर लवकरात लवकर कारवाई न केल्यास सर्व रोजगार मजुरांसह अमरण उपोषण करण्याचा ईशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
बिले उचललेली कामेच नाहीत ग्रामपंचायतीने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शोषखड्डे खांदल्याचे दाखवत लाखोंचे बिले उचलली असून प्रत्यक्षात मात्र गावात एकही शोषखड्डा खांदला नसल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.
मयत मजुर १) दत्तात्रय पांडुरंग शेंबडे २) धोंडाबाई रामभाऊ हाके ३) मथुराबाई सावळीराम शेंबडे ४) महादेव काशिनाथ शेंबडे ५) नामदेव महादेव शेंबडे ६) नारायण रामभाऊ भारती ७) फाताबाई बाबा पठाण ८)धोंडिराम यादव माने ९) कचराबाई धोंडिराम माने १०) सुर्यभान यादवराव माने ११) ज्ञानोबा शिवराम साळवे १२) चतुराबाई ज्ञानोबा साळवे १३) शहाबाई संभाजी कुडुक १४) हरिभाऊ भानुदास महानोर १५) विमल हरिभाऊ महानोर १६) साहेबराव काशिनाथ शेंबडे १७) भिमराव काशिनाथ शेंबडे
संबंधीतांनी केले हात वर झालेल्या प्रकाराबाब सरपंच, ग्रामसेवक व रोजगार सेवक यांनी आम्ही हा प्रकार केला नसल्याचा आव आणत गटविकास अधिकारी, गेवराई यांना एक पत्र सादर केले असून हा प्रकार नेमका कोणी केला असा प्रश्न ग्रामस्थ व मजुरांमध्ये निर्मान झाला आहे.
व्यवस्थेवर आमचा विश्वास असून झालेल्या कामाची निःपक्षपणे चौकशी होणे अपेक्षीत आहे. आम्ही बिडिओ, गेवराई, मुख्य कार्यकारी अधिकारी, बीड व जिल्हा अधिकारी कार्यालय बीड यांना निवेदने सादर केली असून लवकरात लवकर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.








