कोविड-19 संसर्ग उपाययोजनेतंर्गत प्लाझमा थेरेपी ट्रायल उपचार पध्दती (प्रोजेक्ट प्लॅटिना) राबविण्यात यावी - मुख्य सचिव संजय कुमार

Beed

कोविड-19 संसर्ग उपाययोजनेतंर्गत प्लाझमा थेरेपी ट्रायल उपचार पध्दती (प्रोजेक्ट प्लॅटिना) राबविण्यात यावी - मुख्य सचिव संजय कुमार

बीड/प्रतिनिधी 

राज्यात कोविड-19 संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. राज्यामध्ये कोविड-19 उपचारातंर्गत प्लाझमा उपचार पध्दतीसंदर्भातील "प्रोजेक्ट प्लॅटिना" दिनांक 29 जून 2020 पासून सुरु करण्यात आला आहे. प्रोजेक्ट प्लॅटिना अंतर्गत ऑफ लेबल प्लाझमाचा वापर मध्यम प्रकारच्या कोविड रुग्णांवर करण्यात येतो. सदर प्रकल्पातंर्गत ऑफ लेबल प्लाझमाचा वापर खाजगी रुग्णालयांतील करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुषंगाने प्लाझमा थेरपीचा वापर व मागणी यामध्ये वाढ होत आहे. यामुळे कोविड-19 वरील उपचारासाठी खाजगी रुग्णालयांमधून ऑफ लेबल प्लाझमाबाबत प्राप्त होणाऱ्या मागणीच्या अनुषंगाने संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन यांनी कार्यपध्दती नमूद केली आहे. तसेच कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव व ऑफ लेबल प्लाझमाची वाढती मागणी विचारात घेता जास्तीत जास्त प्लाझमा संकलित करण्याबाबत आवश्यक उपाययोजना करावी असे मुख्य सचिव संजय कुमार यांनी सुचित केले आहे.

या अनुषंगाने अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर यांचे अध्यक्षतेखाली खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातून कोविड-19 च्या रुग्णांच्या ऑफ लेबल प्लाझमा बाबत प्राप्त होणाऱ्या मागणीच्या अनुषंगाने कार्यपध्दती तयार करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. सदर समितीने प्लाझमा बाबत प्राप्त होणाऱ्या मागणीच्या अनुषंगाने कार्यपध्दती तयार करण्यात आली आहे. त्या कार्यपध्दती नूसार संस्थांनी पुढील आवश्यक ती कार्यवाही करावी असे निर्देश संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांनी दिले आहेत.

जिल्हयात कोव्हिड-19 संसर्ग उपाययोजनेतंर्गत प्लाझमा थेरेपी ट्रायल उपचार पध्दती राबविण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. त्यानुसार बीड जिल्हयात कोव्हिड-19 चा वाढता प्रादुर्भाव व त्यावरील उपचारासाठी खाजगी रुग्णालयांमधून ऑफ लेबल प्लाझमा बाबत प्राप्त होणाऱ्या मागणीच्या अनुषंगाने संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन यांच्या दि. 10 ऑगस्ट 2020 रोजीच्या सूचनांनूसार कार्यपध्दती लागू करण्यात आलेली आहे. बीड जिल्हयात कोव्हिड-19 संसर्ग उपाययोजनेतंर्गत प्लाझमा थेरेपी ट्रायल उपचार पध्दती राबविण्यात यावी असे जिल्हाधिकारी,बीड यांच्या वतीने आदेश देण्यात आले आहे.

Sharing

Visitor Counter