अंगणवाडी ताईंना दिवाळीचा 15 हजार बोनस द्या-दिलीप भोसले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

अंगणवाडी ताईंना दिवाळीचा 15 हजार बोनस द्या-दिलीप भोसले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी
बीड /प्रतिनिधी
कोरोना सारख्या महामारीमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालुन पुर्ण ताकतीनिशी या लढ्यामध्ये सहभागी झालेल्या अंगणवाडी सेविका यांना 15 हजार रूपये आणि मदतनिस यांना 10 हजार रूपये (सानुग्रह अनुदान) बोनस देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य धनश्री अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दिलीप भोसले यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.उध्दवजी ठाकरे, महाराष्ट्र राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री यशोमतीताई ठाकुर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अंगणवाडी सेविका, मदतनिस प्रत्येक राष्ट्रीय आपत्तीमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून घराकडे दुर्लक्ष करून दिलेली जबाबदारी पुर्णपणे पार पाडतात. अद्याप दोन महिन्याचे मानधन रखडलेले आहे. कोरोनामध्ये आर्थिक परिस्थिती वाईट असतांना अंगणवाडी ताईंना कुठलाही आधार नाही. दरम्यानच्या काळात सरकारकडून निवृत्त झालेल्या अंगणवाडी ताईंना एक रकमी रक्कम देणार असल्याचे जाहीर केले. त्यांचे अभिनंदन पण सद्य परिस्थितीत काम करणार्या अंगणवाडी ताईंना कुठलाही लाभ मिळालेला नाही. एकीकडे मनपा कर्मचार्यांना बोनस जाहीर होतो, बेस्ट कर्मचार्यांना बोनस जाहीर होतो पण स्वतःचा जीव धोक्यात घालून देशहितासाठी लढणार्या रणरागिणी अंगणवाडी ताईंना बोनस जाहीर होत नाही या पेक्षा दुर्दैव दुसरे कुठलेच असू शकत नाही. सरकारकडे आमची मागणी आहे जर बोनस देता येत नसेल तर किमान एक महिन्याचे आगाऊ मानधन खात्यात जमा करावे. जेणे करून अंगणवाडी ताईंची दिवाळी साजरी होईल. अन्यथा अंगणवाडी ताई ही दिवाळी दिव्याविना अंधारात साजरी करेल याची नोंद सरकारने घ्यावी असा इशारा महाराष्ट्र राज्य धनश्री अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दिलीप भोसले यांनी मा.मुख्यमंत्री, मा.महिला बालकल्याण मंत्री, मा.महिला बालकल्याण आयुक्त यांना पाठविलेल्या निवेदनात दिला आहे.








