एचआयव्ही संसर्गितांना किराणा साहित्याचे किट वाटप विहानमध्ये नवचेतनाने दिला मदतीचा हात

बीड/प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाँकडाऊन सुरू आहे. या काळात गरजवंतांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने येथील विहान प्रकल्पात नवचेतना सर्वांगिण विकास केंद्र,केजच्या वतीने एचआयव्ही संसर्गित व निराधारांना बुधवारी किराणा साहित्याचे किट वाटप करण्यात आले.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार सज्ज झाले आहे. बीडमध्येही जिल्हा प्रशासनाकडुन उपाययोजना राबविल्या जात आहेत. लाँकडाऊनमुळे निराधार, मजुर व हातावर पोट असलेल्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे जिल्ह्यात विविध सामाजिक संस्थांकडुन गरजवंतांना मदत केली जात आहे. दरम्यान, नवचेतना सर्वांगिण विकास केंद्र,केज च्या अध्यक्ष मानिषा घुले यांच्या वतीने बीड विहान प्रकल्पाच्या माध्यमातून तालुक्यातील एचआयव्ही संसर्गित व निराधारांना किराणा सामानाचे किट वाटप करण्यात आले. प्रशासनाच्या नियमाचे पालन करत बुधवारी 16 एचआयव्ही संसर्गित व निराधारांना किराणा सामानाचे किट जिल्हा शल्यचिकित्सक डाँ.अशोक थोरात यांच्या उपस्थितीत वाटप केले. जवळपास 55 गरजवंतांना हे किट वाटप केले जाणार आहे. यावेळी वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. पटेल, बालमजुर प्रकल्प संचालक ओमप्रकाश गिरी,विहानचे प्रकल्प संचालक राजन दहिवाळ, सुर्याेदयचे संपादक गंगाधरराव काळकुटे, पंचायत समिती सदस्य पूजा मोरे, शिवणी हायस्कुलचे प्राचार्य प्रशांत पवळ, समुपदेशक संतोष डोलारे, समन्वयक स्मिता कुलकर्णी, शेख दादामिया, रामेश्वर जगरवाल, निकिता बोराडे, शीतल गोचडे, अर्चना शिंदे उपस्थित होते.








