कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे चिंचाळा येथील जगदंबा देवीची यात्रा रद्द.

आष्टी/तुकाराम गणगे.
बीड प्रसार न्युज
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आष्टी तालूक्यातील चिंचाळा येथील २८ व २९ एप्रिल रोजी होणारी जगदंबा देवीची यात्रा रद्द करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. या यात्रेस पुणे,मुंबईसह बाहेरगावी राहणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते.
जगदंबा देवी यात्रा महोत्सव दोन दिवस असतो. अत्यंत प्रसिद्ध असलेल्या या यात्रा महोत्सवात पहिल्या दिवशी पालखी मिरवणूक व सांस्कृतिक कार्यक्रम आणि दुसऱ्या दिवशी जंगी कुस्त्यांचे सामने असतात. मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. तसेच यात्रेत पुणे, मुंबई सह बाहेरगावी असणारे भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर येत असल्याने ग्रामस्थांनी खबरदारी म्हणून दि.२८ व २९ एप्रिल रोजी होणारा यात्रा महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यात्रेसाठी येणारे पाहुणे, भाविक भक्त आणि मल्ल यांनी याची नोंद घ्यावी. अन्यथा येणारे पाहुणे व चिंचाळा गावातील कुटुंब प्रमुख यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात येईल, असे आवाहन ग्रामसेवक रामेश्वर भवर, सरपंच पती दिगांबर पोकळे (नाना), ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देवस्थान व यात्रा कमिटी तसेच ग्रामस्थांनी बैठक घेऊन यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.








