मराठा आरक्षण रद्द होणे हा मराठा समाजाच्या दृष्टीने काळाकुट्ट दिवस - आ.विनायक मेटे

Beed

मराठा आरक्षण रद्द होणे हा मराठा समाजाच्या दृष्टीने काळाकुट्ट दिवस - आ.विनायक मेटे

मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दुसऱ्याकडे बोट दाखवणे बंद करुन स्वत: मुख्यमंत्री या नात्याने मराठा मुला-मुलींसाठी काय निर्णय घेतात हे सांगावे - आ.विनायक मेटे

मराठा समाजाच्या मुला-मुलींचे भविष्य अंधकार करणारे अशोक चव्हाण यांनी प्रायश्चित्त म्हणुन मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा - आ.विनायक मेटे यांची मागणी

(बीड/प्रतिनिधी)

न्यायालयाने दिलेला आजचा निकाल म्हणजे मराठा समाजासाठी काळा दिवस आहे. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावुन घेण्याच आणि अन्नामध्ये माती कालवण्याच काम या सरकारच्या नाकर्तेपणामुळे झाले आहे. राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलं आहे. राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. मराठा आरक्षणाच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या प्रकरणी न्यायमूर्ती अशोक भूषण, नागेश्वरराव, एस. अब्दुल नाझीऱ, हेमंत गुप्ता आणि रवींद्र भट यांच्या खंडपीठाने आज निकाल सुनावला आहे. हा निकाल मराठा आरक्षणाच्या विरोधात झालेला असून, आजचा दिवस मराठा समाजासाठी काळाकुट्ट दिवस समजला जाणार. आजवर मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने सोयीस्करपणे दुर्लक्ष केलेले आहे. मा.मुख्यमंत्री व अशोक चव्हाण यांनी याबाबतीत दुरऱ्यांकडे बोट दाखवण्यापेक्षा आपण स्वत: काय दिवे लावणार याकडे लक्ष दिले पाहीजे. याबाबत मराठा समाज त्यांना कधीही माफ करणार नाही, असेही आ.विनायक मेटे यांनी सांगितले आहे.

 

पुढे बोलतांना त्यांनी ना.अशोक चव्हाण यांनी या निकालाच्या अनुषंगाने प्रायश्चित्त म्हणुन तात्काळ राजीनामा सादर केला पाहीजे अशी मागणी यावेळी केली. मराठा आरक्षणाच्या पहिल्या सुनावणीपासून आतापर्यंतच्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारने याकडे गांर्भीयाने लक्ष दिले नाही. सरकारची बाजू मांडणारे वकिल गैर हजर होते, गायकवाड आयोगाचे भाषांतरण न करने अश्या प्रकारचे आप-आपसात त्यांच्यात असमन्वय होता. तसेच 102 व्या घटणा दुरुस्तीबाबतही राज्य सरकारने काय भुमीका घेतली पाहीजे यामध्येही त्यांच्यात एक वाक्यता नव्हती. यासाठी सर्वस्वी अशोक चव्हाण हेच जबाबदार आहेत म्हणुन त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा असेही आ.विनायक मेटे यांनी यावेळी मागणी केली.

 

छ.शिवाजी महाराजांना ही स्वराज्य निर्माण करण्यासाठी संघर्ष करावा लागलेला होता. तसेच 30-35 वर्षापासून आपण संघर्ष करुन हे मराठा आरक्षण मिळवलेले होते, ते आरक्षण राज्य सरकारला साधे टिकवता सुध्दा आले नाही. मराठा आरक्षणासाठी 42 लोकांनी बलीदान दिले, हाजारो लोकांनी आरक्षणासाठी रस्त्यावर येवून संघर्ष थापीत केला, हजारो कुटुंबाचे संसार उध्दस्त झाले या सर्वांचे या सरकारला काहीही वाटत नाही म्हणून राज्य सरकारला व अशोक चव्हाण यांना मराठा समाज कधीही माफ करणार नाही. या दोघांच्या मनमानीमुळेच आजचा काळाकुट्ट दिवस उगवलेला आहे. आता मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान, राष्ट्रपती व केंद्र सरकारकडे बोट दाखवणे बंद करावे व स्वत: काय व कसा न्याय देणार असा संताप आ.विनायक मेटे यांनी केला आहे.

 

मराठा समाजाने सातत्याने यासाठी संघर्ष केलेला आहे. या सरकारकडून न्याय मिळवून घ्यायचा असेल तर संघर्षच करावा लागेल, त्यांना सळो कि पळो करुन सोडावे लागेल. यासाठी ज्या मराठ्यांना आपल्या पुढील पीढीची काळजी आहे, त्यांनी हे आंदोलन जसे जमेल तसे हातात घ्यावे व समाजाला हे सरकार जोपर्यंत न्याय देत नाही तोपर्यंत शांत बसु नये. हे करत असतांना कोविडचे सर्व नियम पाळून व लोकशाही च्या शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे अशी सर्व मराठ्यांना माझी विनंती आहे. मराठा समाजाचे हित पाहणाऱ्या इतर सर्व समाजांनाही माझी विनंती आहे मराठा समाजाच्या या अन्यायच्या विरोधातील लढ्यास समर्थन देवून सहकार्य करावे असे आ.विनायक मेटे यांनी सांगितले.

Sharing

Visitor Counter