शेतकऱ्यांनी कुठल्याही भूलथापांना बळी न पडता नामांकीत कंपनीचे बी-बियाणे खरेदी करावेत - राजेंद्र सुपेकर.

शेतकऱ्यांनी कुठल्याही भूलथापांना बळी न पडता नामांकीत कंपनीचे बी-बियाणे खरेदी करावेत - राजेंद्र सुपेकर
आष्टी/तुकाराम गणगे.
बीड प्रसार न्युज.
दि.१७ रविवार पासून तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांच्या खरीप हंगाम पूर्व तपासणीस सुरुवात करण्यात आली. यावेळी तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, मंडळ कृषी अधिकारी गोरख तरटे तसेच पंचायत समितीचे कृषी अधिकारी उद्धव नेटके, धनंजय निंबाळकर व श्री बेग यांनी काम केले. सध्या विविध प्रकारचे बियाणे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहे, त्याचे नमुने तपासणीसाठी हस्तगत केले. कोरोना च्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी सध्या शेतकरी वर्गाची लगबग सुरू झाली आहे. बाजारामध्ये शेतकरी कृषी सेवा केंद्रांमध्ये गर्दी करू लागले आहेत. त्याचबरोबर वळिवाचा पाऊस झाल्यामुळे शेतातील पूर्व मशागतीची कामे सुरू असून पुरेसा पाऊस झाल्यानंतर लगेचच पेरणी उरकून घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. यासाठी आवश्यक बी-बियाणे खते कीटकनाशक यांच्या खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रावर शेतकरी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. याचा गैरफायदा घेऊन काही विक्रेते बोगस व दुय्यम प्रतीचे बियाणे खते व कीटकनाशके विक्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी तसेच शेतकऱ्याला उत्तम प्रतीचे बियाणे खते व कीटकनाशके मिळावेत व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारातील गर्दी नियंत्रणात रहावी यासाठी तालुक्यातील १२२ कृषी सेवा केंद्रांची तपासणी मोहीम स्वरूपात येत्या आठ दिवसांमध्ये करण्यात येणार आहे, यामध्ये कृषी सेवा केंद्राचा परवाना, साठा रजिस्टर, भाव फलक याची तपासणी सदरील अधिकाऱ्यांच्या मार्फत करण्यात येत आहे.
खते बी-बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी कुठल्याही भुल थापांना बळी न पडता नामांकित कंपन्यांची उत्पादने बिलासह खरेदी करावी, तसेच खरेदी केलेल्या बियाण्यांचे बिले, टॅग व पिशव्या जपून ठेवाव्यात. कोठे गैरप्रकार आढळून आल्यास तातडीने कृषी विभागाशी संपर्क साधावा,
असे आवाहन तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी केले आहे.








