बौद्धिक कुवत आणि आवडीनुसार करीअर निवडा 

Beed

बौद्धिक कुवत आणि आवडीनुसार करीअर निवडा 

दत्ता देशमुख यांचे मत; जिल्हा रत्न पुरस्काराने सन्मान

बीड/प्रतिनिधी

सर्वच पालकांना आपली मुले अभियंता, डॉक्टर व्हावी वाटतात. या दोन शाखांतील प्रवेश म्हणजेच करिअर असे चित्र निर्माण झाले आहे. मात्र, करिअरसाठी शेकडो संधी आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांवर मते लादण्यापेक्षा त्यांची बौद्धिक क्षमता व आवड लक्षात घ्यावी, विद्यार्थ्यांनीही याचीच सांगड घालून वाटचाल करावी, असे मत ‘सकाळ’चे जिल्हा बातमीदार दत्ता देशमुख यांनी व्यक्त केले.
सैदापूर (ता. गेवराई) येथील संत खंडूजी बाबा विद्यालयातर्फे दत्ता देशमुख यांचा गुरुवारी (दि. १३) जिल्हा रत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप होते. यावेळी श्री. देशमुख यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे सचिव बाळाभाऊ सुतार, मुख्याध्यापिका निलावती भालेकर, नवनाथ महाराज उगले, सुभाष काळे महाराज उपस्थित होते.
दत्ता देशमुख म्हणाले, ज्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण प्रवेशात अपयश येते तेच पुढे स्पर्धा परीक्षांतून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या भारतीय प्रशासन सेवा, भारतीय पोलिस सेवांसह महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांतून इतर उच्च पदांवर जाऊन जिल्हास्तरीय पदांवर बसतात. आपल्याला जे सर्वोच्च करिअर वाटते ते अशा पदांपुढे ठेंगणे ठरते. करिअरच्या इतर संधी व आपली आवड यानुसार ध्येय ठरवावे. पालकांनी देखील आपल्या स्वत:च्या सर्व क्षमतांची जाणीव ठेवावी, असेही ते म्हणाले. किशोर राऊत, योगीराज सुतार, गणेश राऊत, पृथ्वीराज राऊत, राम पवार, श्रीमती पांचाळ, अशोक नाईकवाडे यांची उपस्थिती होती. सुत्रसंचलन एन. आर. सय्यद यांनी केले. प्रतिक्षा नाईकवाडे, संचिता दातखिळ, प्रतिक्षा डोंगरे, प्रतिभा डोंगरे, प्रगती राऊत या विद्यार्थीनींनीही राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या जिवनचरित्रावर भाषणे केली.

Sharing

Visitor Counter