मन्मथ आलासे भूलोकीच्या गजरात संत शिरोमणी मन्मथ स्वामी माऊलींचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा

मन्मथ आलासे भूलोकीच्या गजरात संत शिरोमणी मन्मथ स्वामी माऊलींचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा
बीड/प्रतिनिधी
येथून जवळच असलेल्या तीर्थक्षेत्र कपिलधार येथील वीरशैव समाजाचे श्रद्धास्थान संत शिरोमणी मन्मथ स्वामी माऊली यांच्या संजीवन समाधी स्थळी माऊलींचा 464 वा जन्मोत्सव सोहळा मन्मथ आलासे भूलोकी, संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय च्या जयघोषमध्ये हजारो भक्तांच्या साक्षीने साजरा करण्यात आला. जन्मोत्सवासाठी बीड, माजलगाव, जामखेड येथून पायी दिंडीने भक्तगण मोठ्या संख्येने भजनी मंडळासह दाखल झाले होते.
बीड पासुन अवघ्या काही अंतरावर तीर्थक्षेत्र कपिलधार येथे वीरशैव समाजाचे श्रद्धास्थान असलेले संत शिरोमणी मन्मथ स्वामी माऊलींचे संजीवन समाधी स्थळ आहे. शनिवार दिनांक 5 फेब्रुवारी 2022 रोजी माऊलींचा 464 वा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात हजारो भक्तांच्या साक्षीने साजरा झाला.पहाटे 3 वाजता संत शिरोमणी मन्मथ स्वामी माऊलींच्या संजीवन समाधी स्थळाची विधीवत महापूजा करण्यात आली. सकाळी काकड आरती, त्यानंतर धार्मिक विधीनुसार जन्मोत्सव कार्यक्रम ष ब्र 108 डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य मन्मथधाम आणि ष ब्र 108 चंद्रशेखर शिवाचार्य महाराज, माजलगावकर महाराज यांच्या प्रमुख सानिध्यात संपन्न झाली.दुपारी 12 वाजता पाळणा हलवून हजारो भक्तांनी आपल्या भक्तीचे श्रद्धास्थान असलेल्या गुरुमाउलींचा जन्मोत्सव गुलालाची उधळण करत साजरा केला.
संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांचा जन्म नेकनूर येथे सन 1482 साली सोमवारी शिवलिंग स्वामी आणि पार्वतीबाई यांच्या पोटी झाला. लहानपणापासून अतिशय कुशाग्र बुद्धीचे असलेले मन्मथ माऊलींनी आपल्या शिष्यांसोबत यात्रा करताना मोठ्या प्रमाणात ग्रंथ साहित्य निर्माण केले. यामध्ये प्रामुख्याने परमरहस्य ग्रंथाने इतिहास निर्माण केला. ऐन उमेदीच्या तरुण्य वयात त्यांनी कपिलधार येथे संजीवन समाधी घेऊन आपल्या जीवन यात्रेला पूर्णविराम दिला. संत शिरोमणी मन्मथ स्वामी माऊलींच्या जन्मोत्सवानिमित्त महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, आंध्र आदी राज्यातून देखील हजारो भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी दाखल झाले होते. कोरोना महामारीच्या दोन वर्ष खंडानंतर या वर्षी कपिलधार येथे जन्मोत्सव यात्रा मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाली.
माजलगाव, बीड, जामखेड येथून पदयात्रा
माजलगाव मठाचे मठाधिपती सद्गुरु मिस्कीन स्वामी यांच्या काळापासून तपोरत्नं प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य महाराज पर्यंत माजलगाव ते कपिलधार जन्मोत्सवानिमित्त पदयात्रेची परंपरा चालत आलेली आहे. ही परंपरा माजलगाव मठाचे नवीन मठाधिपती चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांच्या सानिध्यात माजलगाव येथून बीड येथील भाविक भक्तांच्या पायी दिंडी समवेत कपिलधार येथे मोठ्या उत्साही वातावरणात दाखल झाली.तर जामखेड येथून मांजरसुंबा येथील मन्मथ धाम मठाचे मठाधिपती डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराजांच्या सानिध्यात मोठ्या उत्साहामध्ये कपिलधार येथे शेकडो महिला पुरुष भक्तांच्या उपस्थितीत दाखल झाली.
पोलीस बंदोबस्त नसल्याने चोरांचा सुळ्सुळाट
तीर्थक्षेत्र कपिलधार येथे संत शिरोमणी मन्मथ स्वामींच्या जन्मोत्सवा निमित्त मोठी यात्रा दरवर्षी भरते. कोरोनामुळे दोन वर्षापासून खंडित झालेली ही परंपरा यावर्षी पुन्हा नव्या जोमाने होणार असल्याने ट्रस्टच्यावतीने पोलिस बंदोबस्त देण्यात यावा अशी मागणी करण्यात येऊनही तुल्यबळ पोलीस बंदोबस्त न दिल्यामुळे परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला.अनेक भाविक भक्तांचे मोबाईल, पॉकेट, महिलांचे दागिने लंपास झाले. काही भक्तांनी तर चोरट्यांना रंगेहात पकडून धुलाई देखील केली. मात्र त्यांना उपस्थित असलेल्या दोन पोलिसांच्या समक्ष मागच्या दाराने सोडण्यात आल्याने भक्तगण संतप्त झाले होते. या घटनेमुळे भक्तांनी बेदखल पोलीस प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला.








