लयचं भारी.. वालमन सुपरवायझर होवून बसला टाकीवरी

लयचं भारी.. वालमन सुपरवायझर होवून बसला टाकीवरी
बीड/प्रतिनिधी
बीड नगर परिषदेमध्ये वालमन म्हणून नियुक्ती असलेल्या व्यक्तीला थेट सुपर वायझरच्या जागेवर बसविले असून बीड शहरातील इसलामपुरा भागात असलेल्या पाण्याच्या टाकीचा कारभार त्याच्याच हाती दिल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे सदर व्यक्ती हा नगरपालिकेला साहित्य पुरवठ्याचे कंत्राटही घेत असल्याचे समजते.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, बीड नगर परिषदमध्ये वालमन म्हणून कामाला असलेल्या व्यक्तीकडे विशिष्ट भागात पाणी सोडण्याचे काम दिले होते. परंतू सदर व्यक्ती वालमनचा थेट सुपरवायझर झाला आहे. एवढेच नव्हेतर सदर व्यक्ती हा ब्लेचिंग पावडर, तुरटी आणि पाणी शुद्ध करण्यासाठी लागणार्या क्लोरिनचा पुरवठा देखील नगरपालिकेला करत असल्याचे समजते. याच्या पुढचा भाग म्हणजे बीड शहरातील काही भागात ज्या ठिकाणी नळाचे पाणी पोहचत नाही अशा ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे कामही याच व्यक्तीकडे दिलेले असल्यामुळे नगरपालिका त्या व्यक्तीवर एवढी मेहरबान का? अशी चर्चा नगरपालिकेच्या आवारातच सुरू झाली आहे. सुपर वायझरच ब्लेचिंग पावडर आणि क्लोरीनचा पुरवठादार असल्यामुळे त्याचा दर्जा काय असेल हे वेगळे सांगायची गरज नाही. असेच चालु राहिले तर बीडवासियांच्या आरोग्याशी खेळण्याचे काम सुरू आहे असे म्हणावे लागेल.कोरोनाच्या काळात आरोग्य विषय शासनाकडून जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे परंतु नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून या बाबत गांभीर्य दिसत नसल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी शहरातील नागरिकांकडून केली जात आहे.








