गांधी महाविद्यालयात राष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

गांधी महाविद्यालयात राष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा
आष्टी/प्रतिनिधी
तालुक्यातील कडा येथील श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे गांधी महाविद्यालयात मंगळवार दिनांक ८ मार्च २०२२ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महिला विभाग, एनएसएस विभाग आणि नॅक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने "उज्वल भविष्यासाठी स्त्री पुरुष समानता" या विषयावर आष्टी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री शिंदे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात मॉं जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने तसेच नारीशक्ती च्या गीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रणरागिनी महीला संघटनेच्या अध्यक्षा डॉ. मीरा नाथ म्हणाल्या की, स्त्रीशक्तीने असे एकही क्षेत्र सोडले नाही. प्रत्येक क्षेत्रात स्वतःला सिद्ध केले आहे. तरीही एकशे पंचवीस वर्षापासून स्त्री स्त्री-पुरुष समानतेसाठी लढत आहे. हा खरच एक चिंतनाचा विषय आहे. प्रत्येक उच्चशिक्षीत महिलांनी आपल्या परिसरातील सर्व गरजू महिलांना मदतीचा हात द्यावा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. आष्टी तालुक्यातील प्रत्येक शाळा-महाविद्यालयात संघटनेमार्फत स्त्री संरक्षण प्रशिक्षण वर्ग चालू करण्याचा मानस आहे असेही त्या म्हणाल्या . प्रमुख मार्गदर्शक डॉ. जयश्री शिंदे याप्रसंगी म्हणाल्या की ग्रामीण भागातील मुलींना पुढे जाताना खूप कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागते परंतु प्रामाणिक कष्ट आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्या नक्कीच पुढे जातील आणि यशस्वी होतील हे सांगताना त्यांनी अनेक प्रेरणादायी दाखले दिले. तसेच स्त्री-पुरुष समानतेसाठी मुलांना पुढाकार घेण्याचे आवाहनही केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जे. एम. भंडारी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आरोग्य विभागातील सर्व स्त्रियांनी कोरोणा काळात दिलेल्या योगदानाबद्दल विशेष गौरवोद्गार काढले. तसेच जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.एस.राठी म्हणाले की प्रत्येक पुरुषाला मोठे करण्यामागे स्त्रीशक्तीचा कार्यभाग असतोच असे सांगत संत मुक्ताई, जिजाऊ यासारख्या अनेक कर्तबगार स्त्रियांचे दाखले दिले. महिला आजच नव्हे तर अनेक वर्षापासून इतिहास घडवत आहे अशा विश्वातील सर्व महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त वंदन करून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आकांक्षा भोसले आणि भाग्यश्री पवार या दोन विद्यार्थिनींनी स्त्री शक्तीवर कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अरुणा कुलकर्णी यांनी केले उपस्थितांचे आभार प्रा. धनश्री मुनोत यांनी मानले. याप्रसंगी प्रा. सुनिता बोंबे, डॉ.सुपर्णा देशमुख, एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. नवनाथ विधाते, नॅक समन्वयक डॉ.नरेंद्र गवळी तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








