आज बाबांचा सतरांवा स्मृतीदिन आदरांजली व विनम्र अभीवादन

Beed

आज बाबांचा सतरांवा स्मृतीदिन
 आदरांजली व विनम्र अभीवादन

"माझे बाबा(दादा)"
फणसा सारखं वरून दिसायला काटेरी पन आतून मात्र मऊ- रसाळ, कनखर आवाजतही श्रवनीय गोडवा, चालन्यातील डौलदारपणा, करूनामयी पन करारी डोळे, धोतर-सदरा व डोक्यावर फेटा बांधन्याची एक विशिष्ट शैली, पापणी मिटवली की बंद डोळ्यासमोर साक्षात ऊभी राहते ती माझ्या बाबांची (आजोबांची, दादांची) मुर्ती...
अध्यात्माचं बाळकडू मलाच नाही तर अख्ख्या गावाला त्यांच्याकडून मिळालं.
"तुका म्हणे सोपी केली पायवाट, ऊतरावया भवसींधू रे" या उक्तीप्रमाणं त्यांनी सुमारे साठ वर्षांपुर्वी गावात वारकरी सांप्रदयाची मुहूर्तमेढ रोवली. ते नुसते गावातुन निघाले तरी पत्ते खेळणारेही पत्ते लपवून ठेवायचे; अनेकजण रस्त्यावरच पाया पडायचे, एखादा संत म्हणून नव्हे तर गावाचा कुटंबप्रमुख म्हणून. त्यांच्यासोबत वारीला जाण्यासाठी गावातून अक्षरशः नंबर लागायचे. वारीच्या एक महीना आधीच गावात तयारी सुरू व्हायची, राज्य परिवहन महामंडळाच्या दोन-तीन बसेस फुल भरून निघायच्या. त्याकाळी एक रुपयालाही मोठी किम्मत होती.  कधी-कधी तर वारीला जाण्यासाठी पैसेही नसायचे पन बाबा निश्चिंत असायचे. विठ्ठलावर त्यांचा दृढ भाव होता ते म्हणायचे "त्यालाच काळजी, तो माझ्या वारीत खंड पडू देणार नाही", अन् व्हायचेही तसेच. वारीला येणा-या प्रत्येकाला ते नगरप्रदक्षीना करऊन "वैकुंठच हे भुवरी" अशी पंढरपुरची इथ्यंभूत माहीती द्यायचे, माऊली प्रमाणेच त्यांची काळजी घ्यायचे. त्यांच्यासोबत वारी घडलेले आजही त्यांची आठवण सांगतात की वारी करावी तर ती "दादां" सोबतंच. 
"एका जनार्दनी तुमचा दास, माझी आस पुरवावी", असा श्लोक मी म्हणायचो, त्यांनी "माझी आस" ऐवजी "त्यांची आस पुरवावी" असं म्हणायला सांगून समाजासाठी झिजण्याची त्यांची तळमळ मला आयुष्याचा सार शिकवून गेली. स्वतःच पुर्ण आयुष्य इतरांसाठी खर्च करतांना आपल्या नातवानं मात्र उत्तम प्रपंच करून परमार्थीक व्हावं अशी त्यांची तळमळ "देख दिवाने अपना नफा" या शिकवणूकीतून लपून रहायची नाही. "खाण्या-पिण्याचा लाड पन अभ्यासाच्या बाबतीत लाड नाही" असं ते निक्षून सांगायचे. "नेकी करो - दरीया मे डालो", "बदी का बदला -  नेकी से करो" अशा त्यांच्या कहावती चालता-बोलता सांगुन एक चांगला माणूस-व्यक्तीमत्व होण्यासाठी लागणारे बिजही ते नकळत मनात रुजऊन जायचे. मराठी, हिंदी, उर्दू, मोडी इत्यादी भाषांमधील त्यांची समृद्धता त्यांच्या बोलण्यातून नेहमीच पाझरायची आणि माझ्या सुदैवाने त्या अमृततुल्य शिदोरीचा साक्षीदार-वारसदार होण्याचं सौभाग्य मला मिळालं याचं मला खरंच अप्रूप आहे .नेटका प्रंपंच करूनही परमार्थ साधता येतो याचे मुर्तीमंत ऊदाहरण म्हणजे माझे "बाबा". ज्या काळात मुलींना घराबाहेर पडनंही अवघड त्या काळात आपल्या मुलांनाच नाही तर मुलीलाही  पदवीधर करून पितृत्व धर्माचे उत्तम पालन करणारा पिता याचे मुर्तीमंत ऊदाहरण म्हणजे माझे "बाबा". असं म्हणतात कर्तृत्ववान व्यक्तीचं आयुष्य कमी असतं, त्यांना पोटाचा आजार होऊन त्याचा प्रभाव हळूहळू वाढत गेला. माझी अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा चालू होती. परीक्षा संपल्यावर कधी एकदा घरी जाऊन बाबांना भेटतो असं झालं होतं. नियतीला मात्र  हे मान्य नव्हतं, सकाळी निघायचं त्याच रात्री निरोप आला... बाबा गेले..... श्वासाची गती बदलली, हुंदके दाटुन आले, आयुष्यात पहील्यांदाच अश्रूंचे बांध फुटले. ह्रदयाच्या मुळाशी खोलवर जखम व्हावी तशी एक वेदना, अंतर्मनाने केलेला आक्रोश....निशब्द आणि निरव शांतता....आजही तेव्हढीच ज्वलंत.
त्यांच्या नंतर त्यांची अवीरत-अखंडीत वारी चालू ठेवण्याचा वारसा श्री विठ्ठल कृपेने मला लाभला. प्रचंड गर्दी असते, विस-पंचवीस किलोमीटर पाई चालावं लागतं, अनंत शारीरिक वेदना होतात, पन तिथं गेल्यानंतर त्या गरूडखांबाला मिठी मारली की बाबांचा तो मायेचा स्पर्श जाणवतो आणि 'भाग गेला शिणं गेला...' अशीच अनुभूती येते. बाबांचे शेवटचे वापरलेले बुट आजही माझ्या जवळ आहेत आणि माझ्या सोबतच या जगाचा निरोप घेतील.... बाबांच्या चरणी नतमस्तक.
-हेमंत लक्ष्मण जाधव.

Sharing

Visitor Counter