शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी फक्त १२ आमदारांच्या जीवावर दोन जिल्ह्याचे नाव बदलले

Beed

शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी फक्त १२ आमदारांच्या जीवावर दोन जिल्ह्याचे नाव बदलले

राष्ट्रवादीचे ५५, काँग्रेसचे ४४ आमदार तोंडाला पट्ट्या लावून ढिम्म बसले !

खरे जातीयवादी कोण हे आता जनतेने ओळखावे - ॲड. शेख शफीक भाऊ

बीड/प्रतिनिधी

काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत मिळून शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या अडीच वर्षांपासून पांघरलेला सेक्युलरिझम चा बुरखा टराटरा फाडत आपण अजूनही मूळचे जातीयवादीच आहोत हे जाता-जाता फक्त १२ आमदारांच्या जीवावर दोन जिल्ह्यांचे नाव बदलून दाखवून दिले. विशेष म्हणजे सेक्युलरिझम चा गुत्ता ठोक भावात घेतलेला असल्याचे दाखविणाऱ्या काँग्रेसचे ४४ तर राष्ट्रवादीचे ५५ आमदार असतानाही हा निर्णय घेण्यात आला. तेव्हा आता जनतेनेच ओळखावे की खरे जातीयवादी कोण आहेत असे प्रतिपादन औरंगाबाद व उस्मानाबादच्या नामांतराबाबत बोलताना एआयएमआयएम चे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक भाऊ यांनी केले आहे.

या पुढे बोलताना शफिक भाऊ म्हणाले की, आज ऐतिहासिक शहरांची नावे बदलण्यात आली हे सहन करण्यात आले तर पुढे चालून तुमची ही नावे बदलण्यास भाग पाडले जाईल हे लक्षात घ्या. शिवसेना, बीजेपी, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे ही नावे जरी वेगवेगळ्या पक्षांची असली तरी मुळातच या सर्वांची विचारसरणी सारखी असल्याचे या दोन जिल्ह्याच्या नामांतर प्रकरणात दिसून आले. तरीसुद्धा स्वतःला मुस्लिम नेते म्हणून घेणारे वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांनी मुस्लिम समाज आपापल्या वकूबानुसार त्या-त्या पक्षात बांधून घेतला आहे. अशा लोकांमुळे मुस्लिम समाज एकसंध होत नसल्याने अशा प्रकारचे निर्णय सहन करण्याची वेळ समाजावर येते. आता वेळ आली आहे चुकीच्या व एकतर्फी घेण्यात आलेल्या निर्णयाला हाणून पाडण्यासाठी मुस्लिम समाजानेच एकसंध व संघटित होऊन एआयएमआयएम पक्षासोबत यावे आणि आपली ताकद दाखवून द्यावी.

 

मंत्रिमंडळाची बैठक होती की बारसे ?

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराचा मुद्दा उचलून जो जनतेच्या माथी मारला आहे. त्या अगोदर त्यांनी यावर चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती की, या दोन जिल्ह्यांचे बारसे होते. ज्यात नामकरण सोहळा उरकण्यात आला. असा खोचक प्रश्नही शफीक भाऊंनी उपस्थित केला.

 

बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांचेही समर्थन

बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार असलेले धनंजय मुंडे, संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके, बाळासाहेब आजबे या आमदारांचे समर्थन या दोन्ही जिल्ह्याच्या नामांतरासाठी लाभले. जिल्ह्यामध्ये वावरताना हे तथाकथित सेक्युलरिझम दाखविणारे आमदार विधान भवनामध्ये गेल्यावर मात्र सेक्युलरिझम विसरून जातीयवादी होतात. हे या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आल्याचेही शफीक भाऊ म्हणाले.

Sharing

Visitor Counter