बीड शिवसेनेच्या नशिबी पुन्हा वनवासच येणार !

बीड शिवसेनेच्या नशिबी पुन्हा वनवासच येणार !
बीड/वार्ताहर
शिवसेना अस्तित्वात आल्यापासून ते बीड शहरात तिला भरभराटीचे दिवस यायला तत्कालीन जिल्हाप्रमुख प्रा. सुरेश नवले पर्यंतचा काळ संघर्षाचा होता. परंतु तरणेबांड नवले जिल्हाप्रमुख पदी असताना ते त्यावेळी काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांच्या बैठकीत थुंकले होते. या थुंकण्यामुळे त्यांच्या नावाची फक्त बीड शहरातच नाही तर जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात चर्चा होऊन ते जिल्हाभरातील कट्टर शिवसैनिकांमध्ये कमालीचे लोकप्रिय झाले होते. या घटनेनंतर जेव्हा विधानसभेची निवडणुक लागली तेव्हा त्यांच्या याच लोकप्रियतेचा लाभ उठविण्याकरिता शिवसेनेकडून त्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती.
तेव्हा त्यांनी त्याकाळी आक्रमक व प्रखर हिंदुत्वाला पुढे करून पहिल्यांदा निवडणूक जिंकत आमदारकी मिळवली. परत पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीत सुद्धा त्यांनी विजयश्री खेचून आणली व विद्युत मंत्री, आरोग्य मंत्री अशी पदे भूषविली.
मात्र पक्षांतर्गत झालेल्या मतभेदानंतर त्यांनी शिवसेना सोडली. म्हणून पुढच्या निवडणुकीत शिवसेनेने तत्कालीन जिल्हाप्रमुख असलेल्या प्रा. सुनील धांडे यांना उमेदवारी दिली आणि ते निवडून येऊन आमदार झाले.
मात्र सुरेश नवले यांच्या कार्यकाळातील धमक सुनील धांडे यांच्या कार्यकाळात शिवसेनेमध्ये राहिली नाही. शिवाय धांडे यांच्या आमदारकीच्या कार्यकाळातच क्षीरसागरांनी शिवसेनेला असे काही धोबीपछाड दिले की, शिवसेनेचा एकही नगरसेवक बीड नगर परिषदेमध्ये निवडून येऊ दिला नाही.
यामुळे स्थानिक पातळीवर शिवसेनेचा विकास खुंटला व पक्षीय पातळीवर पक्ष व त्यांचे पदाधिकारी नित्यनेमाने पक्षाकडे सातत्याने असले तरी सुनील धांडे यांच्यानंतर आतापर्यंत शिवसेनेचा आमदार बीड विधानसभा मतदार संघामध्ये निवडून येऊ शकला नाही.
शिवाय धांडे सुद्धा कालांतराने शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले आहेत. आता ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत आहेत.
तसेच बीड नगर परिषदेमध्ये शिवसेनेचे नगरसेवक सुद्धा निवडून येऊ शकले नाहीत. नवले यांच्या काळातील शिवसेनेच्या भरभराटीला अवघ्या पंधरा वर्षानंतर जी ओहोटी लागली ती आजपर्यंत कायम आहे.
या ओहोटी मागे नवले यांचे शिवसेना सोडून जनशक्ती पक्ष काढणे नंतर ते पक्ष सोडून नारायण राणे यांच्यासोबत काँग्रेस पक्षात जाणे ही कारणे ही कारणीभूत आहेत.
नवले यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे त्यांना मागच्या दाराने सहा वर्षांसाठी विधान परिषदेची आमदारकी तर मिळाली. त्या आमदारकीमुळे त्यांचा वैयक्तिक फायदा जरी झाला असला तरी जिल्ह्यात त्यांच्या आमदारकीचा फायदा काँग्रेसला झाला नाही. असो !
बीड मध्ये शिवसेनेच्या आजच्या अवस्थेला क्षीरसागर घराण्याचे राजकारण कारणीभूत आहे. ज्या क्षीरसागरांनी बीड शहरात शिवसेनेला नामोहरम करत सत्ता स्थानापासून पद्धतशीरपणे दूर ठेवले होते. त्याच क्षीरसागरांनी राष्ट्रवादीशी बिनसल्यावर शिवसेनेत प्रवेश केला. हा प्रवेश अधिकृतरित्या फक्त जयदत्त क्षीरसागर यांनीच केला असला तरी आता त्यांचे धाकटे बंधू डॉ. भारत भूषण क्षीरसागर आणि त्यांचे पुत्र डॉ. योगेश क्षीरसागर हेही शिवसैनिक झाले आहेत.
यामुळे बीड शिवसेनेला ताकद मिळेल आणि शिवसेना बीडमध्ये पुन्हा सत्तास्थानी येऊन भरभराटीस येईल. असे एकनिष्ठ व कट्टर शिवसैनिकांना वाटत होते.
परंतु काही दिवसांपूर्वी शिवसेनेतील उभ्या फुटीमुळे क्षीरसागरांनी उघडपणे ना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बाजू घेतली, ना फुटीर एकनाथ शिंदे यांचे उघड समर्थन केले. त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते वेट अँड वॉच च्या भूमिकेतच राहिले.
मात्र प्रभारी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी एकनाथ शिंदे यांचा उघड विरोध करत आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत असल्याचे जाहीर केले होते. मात्र आता उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद जाऊन एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली आहे. तेव्हा अशा अवस्थेत बीडमध्ये शिवसेनेला पुन्हा भरभराटीस आणायचे असेल तर क्षीरसागर असो की जगताप, त्यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत जुळवून घ्यावे लागेल. तरच क्षीरसागर व जगताप यांच्या राजकारणाला पुढे चालना मिळेल.
अन्यथा शिवसेनेचे संस्थापक प्रमुख असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून वडिलोपार्जित मिळालेल्या शिवसेना पक्षात पक्षप्रमुख असलेल्या उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त बारा आमदार उरले आहेत. तेही त्यांच्यासोबत एकनिष्ठ राहतील की, पुन्हा तेही शिंदेंसारखे पक्षाचे बारा वाजवतील हे येणाऱ्या काळात दिसेलच.
परंतु सध्यातरी शिवसेना पक्ष उभा फुटल्याने आणि त्यात गेल्या दोन आठवड्यांमध्ये झालेल्या उलथापालथीने बीड शिवसेनेच्या नशिबी पुन्हा वनवासच येणार असे चित्र सध्या तरी दिसून येत आहे.








