हवे तर पैसे देऊ नका, पण बेइज्जत करू नका - किन्नर खुशी

Beed

हवे तर पैसे देऊ नका, पण बेइज्जत करू नका - किन्नर खुशी

किन्नरांचा सन्मान वाढणारी शासनाने योजना आणावी 

बीड/प्रतिनिधी 

किन्नरांना लहानपणापासून असंख्य वेदना सहन कराव्या लागतात.किन्नर जसा जसा मोठा होतो तशा तशा त्याच्या समस्या आणखीन वाढायला लागतात.या समस्यांचे निराकरण करण्यास अपवाद वगळता कोणीही पुढे येत नाही. त्यामुळे हवे तर एक वेळा पैसे देऊ नका परंतु बेज्जत करू नका. किन्नरांचा सन्मान वाढवण्यासाठी शासनाने सन्मान योजना लागू करावी, अशी भावना गेवराई येथील किन्नर खुशी यांनी प्रसिद्धी पत्रकात व्यक्त केली आहे.

समाजामध्ये पुरुष आणि महिला या दोघांसाठीच कायदे आणि शासकीय सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. दुर्दैवाने या दोन्ही लिंगामध्ये आणखीन एक तृतीयपंथी समाज आहे याची जाणीव ना समाजाला आहे ना शासन, प्रशासनाला आहे. यामुळे किन्नर समाजाच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.यातूनच काही डुप्लिकेट किन्नर देखील समाज व्यवस्था बिघडवण्यासाठी किन्नर समाजात दाखल होत आहेत. या सर्व गोष्टीवर अंकुश निर्माण करण्यासाठी आणि किन्नर समाजाला सन्मान मिळण्यासाठी समाज, शासन आणि प्रशासन स्तरावर काही निकष निश्चित करून सुविधा देणे गरजेचे आहे. किन्नर समाजाला कोणीही कसलेही काम देत नाही. त्यामुळे त्यांना रस्त्यावर उतरून, टाळी वाजवून पैसे मागितल्याशिवाय चरितार्थ चालत नाही. या परिस्थितीचा समाजातील विकृत लोक गैरफायदा घेतात.किन्नर यांना अपमानित करतात. या परिस्थितीत बदल हवा असेल तर किन्नर समाजाला देखील शासनाने शासकीय अनुदान निराधार प्रमाणे सुरू करणे गरजेचे आहे. त्यांना राहण्यासाठी घरकुल सारखी योजना राबवणे अत्यावश्यक आहे. त्यांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र व्यवस्था करणे गरजेचे आहे. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरीमध्ये आणि लोकशाहीतील विविध निवडणुकांमध्ये स्वतंत्र आरक्षण देखील देणे गरजेचे आहे. यामुळे किन्नर समाजाची समाजात मान आणि प्रतिष्ठा वाढेल. त्यांना हिजडा, मिठा, किन्नर असे म्हणून हिणवणे, त्यांचा अपमान करणे हळूहळू कमी होऊ शकेल. यावर प्रशासनाने आणि शासनाने दखल घेऊन किन्नरांना न्याय हक्क द्यावा, यासाठी लवकरच न्याय हक्कासाठी लढा उभारणार असल्याचे गेवराई येथील किन्नर खुशी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

किन्नरांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणार - शेख आयेशा

किन्नर समाजाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यांना कायम मरणयातना सहन कराव्या लागतात. समाज त्यांना इज्जत देत नाही. शासन त्यांच्या समस्यांकडे लक्ष देत नाही. त्यामुळे उभे आयुष्य संकटांना तोंड देत त्यांना व्यथित करावे लागते. अशा जगण्यापेक्षा मरण स्वीकारावे अशा भावना किन्नर समाजामध्ये निर्माण होत आहेत. ही बाब निश्चितच खेदजनक आहे. त्यामुळे भविष्यात किन्नरांना देखील पुरुष आणि महिला प्रमाणेच सन्मान आणि न्याय देण्यासाठी किन्नरांना संघटित करून संघर्ष करणार असल्याचे समाजसेविका तथा पत्रकार शेख आयेशा यांनी म्हंटले आहे. भविष्यात ज्या ही किन्नरांना कोणत्याही समस्या समोर आल्या तर त्यांनी प्रत्यक्ष भेटून संपर्क साधावा अथवा 7030149322 या नंबरवर संपर्क साधावा असे जाहीर आवाहन केले आहे.

Sharing

Visitor Counter