सुनावणी पुन्हा लांबणीवरच ;१ ऑगस्टला होणार सुनावणी

सुनावणी पुन्हा लांबणीवरच ;१ ऑगस्टला होणार सुनावणी
बीड/प्रतिनिधी
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यात सरकार बदलले असले तरी राजकीय पेच मात्र कायम आहे . हा पेच सोडविण्यासाठी बुधवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली परंतू पुन्हा १ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार असल्यामुळे मंत्रीपदाचे राजीनामे देवून शिंदे गटात सहभागी झालेले आणि मंत्रीपदासाठी इच्छूक असलेले अनेकजणांना सलाईनवर रहावे लागणार आहे .विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी १६ आमदारांवर केलेल्या अपत्रातेच्या कारवाईला एकनाथ शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी दोन्ही बाजूंच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. तेव्हा घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता पाहता आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी १ ऑगस्ट रोजी ठेवली आहे. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूंनी आपापलं म्हणणं मांडलं. हा संविधानपीठाचा विषय आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. कारण, यामध्ये १० व्या अनुसूचीचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्टपर्यंत दोन्ही बाजूंना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. आम्ही यावर समाधानी आहोत, आमची बाजू भक्कम आहे. योग्य निर्णय आमच्याच बाजूने येईल, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. मात्र, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर आणखी काही बोलण्यास नकार दिला.








