भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा संताप

भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा संताप
बीड/वार्ताहर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला . उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या टीका करताना म्हटले की , राज्यपाल पद हे मानाच पद असतं . त्या पदाचा मान राखणे हे त्या पदावरील व्यक्तीचे काम आहे . राज्यपाल कोश्यारी यांनी याआधी सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला . आता मुंबईबाबत असे वक्तव्य केले आहे . महाराष्ट्राच्या नशिबी अशी लोक का आली असा सवाल उद्धव यांनी केला . कोश्यारी यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे अशी मागणीही उद्धव यांनी केली . कोल्हापूरचा जोडा दाखवा महाराष्ट्रात अनेक प्रेक्षणीय ठिकाणं आहेत , गड किल्ले आहेत , पैठणीदेखील आहे . कोल्हापुरचा जोडादेखील प्रसिद्ध आहे . आता राज्यपालपदावर बसलेल्या व्यक्तीला कोल्हापुरचा जोडा दाखवण्याची वेळ आहे . सामान्य माणसाने कष्टातून कोल्हापुरी जोडा कसा प्रसिद्ध केला , हे दाखवण्यासाठी त्यांना हा जोडा दाखवावा असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले . कोश्यारी यांनी केलेले वक्तव्य हे अनावधानाने आले नसल्याचेही त्यांनी म्हटले . राज्यपालपदी असलेले कोश्यारी काही ठिकाणी खूपच सक्रिय असतात तर काही वेळेस अजगरासारखे सुस्त असतात अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली . राज्यपालांनी रखडवलेल्या १२ आमदारांच्या यादीचा मुद्दा उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला . राज्यपाल नियुक्त सदस्य नेमण्यासाठी अनुत्सुकता दाखवली . राज्यपाल नियुक्त सदस्य नको असतील तर त्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहायला हवे होते . हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न कोश्यारी यांनी केलेले वक्तव्य हे फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला . मुंबई , ठाण्यासह राज्यात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत . त्यांनी भाषिकांमध्ये हिंदू म्हणून एकवटलेल्या नागरिकांमध्ये फूट पाडण्याचे काम केले आहे . राष्ट्रपतींचे दूत असलेल्या राज्यपालांनी सर्वांना समान वागणूक देणे अपेक्षित आहे . कोश्यारी यांनी आग लावण्याचे काम केले आहे . त्यांना घरी पाठवायचे की तुरुंगात पाठवायचे हे ठरवण्याची वेळ आली आहे .








