जनावरांमध्ये लंपी स्कीन आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी जिल्ह्यात निर्बंध जारी-जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा

जनावरांमध्ये लंपी स्कीन आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी जिल्ह्यात निर्बंध जारी-जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा
अंबाजोगाई, परळी, आष्टी, शिरूर कासार, पाटोदा या तालुक्यातील जनावरांचे बाजार भरवण्यास स्थगिती
या तालुक्यातील जनावरांचे वाहतुकीवर निर्बंध
बीड/वार्ताहर
लंपी स्कीन हा आजाराचा मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात प्रसार होऊ नये म्हणून अंबाजोगाई, परळी, आष्टी, शिरूर कासार, पाटोदा या तालुक्यातील जनावरांचे बाजार भरवण्यासाठी पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. तसेच जनावरांचे वाहतुकीवर निर्बंध घातले आहे, याबाबत जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आदेश दिले आहेत.
बीड जिल्ह्यात मोठ्या जनावरात (गोवर्गीय व म्हैसवर्गीय) मध्ये लंपी स्कीन या विषाणूजन्य रोगाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. बीड जिल्ह्यातील धसवाडी ता.अंबाजोगाई येथे लंपी स्कीन या रोगाचे जनावरे आढळून आले आहेत. तसा अहवाल सहायुक्त पशुसंवर्धन रोग अन्वेषण विभाग पुणे यांनी दिला आहे. त्या अनुषंगाने आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र सत्येंद्र प्रताप सिंग राज्य पुणे यांनी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्याशी चर्चा करुन रोग नियंत्रण करणेबाबत चर्चा केली आहे.
त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके जिल्हा परिषद बीड सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार गटविकास अधिकारी पंचायत समिती, पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा पशूसंवर्धन उपायुक्त एच .पी .बोयाळे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विजय देशमुख तसेच पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती सर्व यांच्याशी लंपी स्कीन या आजारावर नियंत्रण प्रतिबंधात्मक उपाय, उपचार घ्यावयाची काळजी याबाबत सखोल मार्गदर्शन केले असून, यंत्रणेने पशुपालकांमध्ये या आजाराबाबत जनजागृती करणे बाबत सूचना दिलेल्या आहेत. सर्व यंत्रणेने वरील निर्बंधाचे पालन करण्यासाठी जिल्हाधिकारी बीड यांनी आवाहन केले आहे. व पशुपालकांनी पशुधनाची काळजी घेणे बाबत खालील प्रमाणे कळविले आहे.
पशुपालकांनी घ्यायची काळजी : सदरचा आजार हा डास, माशा, गोचीड, चिलटे मार्फत प्रसारित होत असल्यामुळे बाधित पशुधन हे इतर पशुधनापासून वेगळे ठेवण्यात यावे. बाधित पशुधन इतर पशुधनासोबत एकत्र चालण्यास व पाणी पिण्यास सोडू नये. बाधित पशुधनाच्या अंगावर 40 मिली नीम तेल व करंज तेल सम प्रमाणात 10 लिटर पाण्यात साबणाच्या भुकटी सोबत द्रावण करून लावावे. डास,माशा गोचीड चिलटे निर्मूलनासाठी सायफारमेथ्रीन, डेल्टामेथ्रीन किंवा इतर कीटकनाशके उदाहरण इथर 20 टक्के क्लोरोफार्म फोर्मालीन 1 टक्का फेनोल (2%15 मिनिट) सोडियम हायपोक्लोराईट (2-3 %) आयोडीन कंपाऊंड (1.33 द्रावण )आणि अमोनिया कंपाऊंड (0.5% ) ची गोठ्यातव परिसरात फवारणी करावी. कीटकनाशके फवारणीसाठी लागणारा निधी ग्रामपंचायत मार्फत उपलब्ध करून देण्यासाठी सर्व ग्राम विकास अधिकारी /ग्रामसेवक यांना जिल्हाधिकारी यांनी आदेशीत केले आहे. आपल्या गावात किंवा परिसरात या रोगाचे रुग्ण आढळून आले असल्यास तातडीने दवाखाना किंवा ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विजय देशमुख जिल्हा परिषद बीड यांनी केले आहे








