मराठवाड़ा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित दुर्मिळ चित्र प्रदर्शनास उत्कृष्ट प्रतिसाद

मराठवाड़ा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित दुर्मिळ चित्र प्रदर्शनास उत्कृष्ट प्रतिसाद
बीड/वार्ताहर
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित भारतीय स्वातंत्र्यलढा आणि मुक्ती संग्राम लढ्यातील, विविध घटना, घडामोडी आणि या लढ्यातील थोर स्वातंत्र्य सेनानींच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन बीड शहरात सुरू आहे. शहरातील विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनी भेट देऊन प्रदर्शनाची पाहणी केली.
प्रदर्शन स्थळी, जिल्हा परिषदेच्या बीड तालुक्यातील महिला बालकल्याण विभागाद्वारे पोषण माह निमित्त सकस आहारचे प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनात जवळपास 45 अंगणवाडी आणि मदतनीस कार्यकर्त्यांनी भाग घेतला. विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते पारितषिके देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास भारत सरकारच्या प्रकाशन विभागाचे सहायक संचालक उमेश उजगरे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी पी. कुमार, महिला बालकल्याण अधिकारी श्रीमती तांदळे, पर्यवेक्षिका आणि 150 अंगणवाडी कार्यकर्त्या आणि मदतनीस उपस्थित होत्या.
शहरातील अहिल्याबाई होळकर सभागृहात हे प्रदर्शन सुरू असून, दि. 17 सप्टेंबरपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनास सर्वांनी भेट द्यावी, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.








