भगवान गडावर दसरा मेळाव्यात हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित

भगवान गडावर दसरा मेळाव्यात हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित
बीड/प्रतिनिधी
भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडेंनी वारशाच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. मी गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत नाही तर त्यांनी ज्या दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांचा झेंडा हाती घेतला त्याचा वारसा मी चालवते. दीनदयाल उपाध्याय आणि अटल बिहारी वाजपेयींपेक्षा गोपीनाथ मुंडेंचा वारसा वेगळा आहे का? असे पंकजा मुंडे म्हणाल्या. मी शत्रूंविषयी वाईट बोलत नाही तर ज्यांच्या विचारांचा वारसा चालवते त्यांच्याविषयी वाईट कसे बोलेल असेही त्या म्हणाल्या.
२०१९ च्या निवडणुकीत राज्यभरात मी सभा घेतल्या. एवढे लोक माझ्यासोबत आले तर माझी ताकद वाढणार की नाही. मी हात जोडून विनंती करते की हा विषय आता बंद करा. काल परवा जन्माला आले नाही. १७ वर्षे राजकारण करते आहे. व्यक्तीपेक्षा संघटन श्रेष्ठ ही आमची शिकवण आहे. मी ते पाळते असे त्या म्हणाल्या. मीडियाला मी हात जोडते की हे बंद करा. पुढे कोणती यादी तुमच्याकडे आली की माझे नाव त्यात टाकू नका. मी कुणावरही नाराज नाही. मी का कुणावर नाराज होऊ असे पंकजा म्हणाल्या.
मला काहीही मिळाले नाही याचे दुःख मला नाही. समाजाच्या हितासाठी जे होत असेल ते मला मान्य आहे. समाजाला बांधायचे सोडून समाजात भिंती उभ्या करण्याचा प्रयत्न केला तर त्याला क्षमा करणार नाही असा ते म्हणाल्या.








