गौतम बुद्धांनी मानवी समूहाचे दुःख नष्ट केले

गौतम बुद्धांनी मानवी समूहाचे दुःख नष्ट केले
वरवटी येथी तेजवन बुद्ध विहारात बुद्धवंदना : सुनिल डोंगरे
बीड/प्रतिनिधी
भगवान गौतम बुद्ध मानवतावादी होते. मानवी जीवन आनंददायी, सुंदर करण्यासाठी त्यांच्या तत्त्वज्ञानाची जगाला आजही गरज आहे.गौतम बुद्ध मोठ्या उदात्त हेतूने राजवाड्याबाहेर पडले. हा गृहत्याग म्हणजे कौटुंबिक जबाबदारी झटकून संन्यासाश्रमाचा स्वीकार नव्हता, तर मानवी समूहाचे दुःख नष्ट करून त्यांना आनंद देण्यासाठीच्या कारणांची मीमांसा आणि त्यावरील उपाययोजना यासाठी होता.असे विचार पत्रकार सुनिल डोंगरे यांनी व्यक्त केले.
बीड तालुक्यातील वरवटी येथील तेजवन बुद्ध विहारात रविवार (ता.१६) रोजी बुद्धवंदनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी उपस्थित बौद्ध उपासक उपासिका यांना मार्गदर्शन करताना सुनिल डोंगरे बोलत होते. यावेळी राजेश शिंदे यांच्यासह परिसरातील निष्ठावान बौद्ध उपासक-उपासिका, बालक-बालिकांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना सुनिल डोंगरे म्हणाले की, भगवान गौतमबुद्धांचे तत्त्वज्ञान सर्वव्यापी आहे. त्यांनी दुःखाचे कारण आणि त्यावरील उपाययोजना सांगितली. जीवन दुःखमय आहे, त्याचे कारण तृष्णा आहे. तृष्णेचा नाश केला तर दुःखातून मुक्ती मिळते. यावर अष्टांगिक मार्ग हा उपाय आहे. दुःख नष्ट करता येते, हा प्रयत्नवाद बुद्धांनी सांगितला.पारंपरिक अंधश्रद्धेला बुद्धांनी तिलांजली दिली. बुद्ध हे बुद्धिप्रामाण्यवादी होते.ते अनित्यवादी आणि अनात्मवादी होते. घडणाऱ्या घटनांमागे शास्त्रीय कारण आहे, चमत्कार नाही. निसर्गामध्ये घडणाऱ्या घटनांचे शास्त्रीय विश्लेषण करणारे जगातील पहिले शास्त्रज्ञ म्हणजे बुद्ध. बुद्धांचे विचार, तत्त्वज्ञान आणि कार्य हे चमत्कारावर नव्हे, तर ज्ञानावर आधारलेले आहे.दरम्यान उपासिका सुदामती शिंदे यांच्या वतीने फलोपहार करण्यात आला. यावेळी बबन शिंदे, सोजरबाई वारभाऊ, कौशल्या शिंदे, दीक्षा शिंदे, सचिन शिंदे, प्रणव शिंदे यांच्यासह परिसरातील निष्ठावान बौद्ध उपासक-उपासिका, बालक-बालिकांची उपस्थिती होती.
प्रत्येक गावात असा उपक्रम होणे गरजेचे
उध्दारकर्ते महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदेशानुसार वरवटी येथील जेतवन बुद्ध विहारात दर रविवारी बुद्ध वंदनेचा कार्यक्रम घेतला जातो. भावी पिढ्यांवर बौद्ध धम्माचे संस्कार होण्यासाठी व बौद्धांमध्ये एकजूट निर्माण होण्यासाठी हा उपक्रम राबविला जातो. त्यामुळे प्रत्येक गावात असा उपक्रम होणे गरजेचे आहे.








