सावरकर विद्यालयाचा फ़ैज़ान ताहेरखान पठाण याच्या प्रयोगाला प्रथम क्रमांक

Beed

सावरकर विद्यालयाचा फ़ैज़ान ताहेरखान पठाण याच्या प्रयोगाला प्रथम क्रमांक 

तीन आठवड्यांपासून बक्षीस व प्रशस्तीपत्राची प्रतिक्षा;मुख्याधिकारींनी लक्ष देण्याची मागणी

बीड/प्रतिनिधी

बीड नगर परिषद तर्फे स्वच्छता अमृत महोत्सव दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ दरम्यान साजरा करण्यात आला. यानिमित्त दिनांक ३० सप्टेंबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या स्वच्छता विषयक नाविन्यपूर्ण उपक्रम प्रदर्शन स्पर्धेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी फ़ैज़ान ताहेरखान पठाण याने सादर केलेल्या "विघटनशील पदार्थापासून खत निर्मिती" प्रकल्पाला प्रथम क्रमांकाचे बक्षीस घोषित झाले आहे. यात ५००१ रूपये व प्रशस्तीपत्र असे बक्षिसाचे स्वरूप आहे. मात्र तीन आठवडे उलटूनही बक्षीस व प्रशस्तीपत्र मिळत नसल्याने याकडे बीड नगर परिषद मुख्याधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.

                     बीड नगर परिषदेत स्वच्छता अमृत महोत्सव अंतर्गत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात स्वच्छता विषयक नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन वेगवेगळे प्रयोग सादर करून दाखविले. यामध्ये बीड शहरात सराफा लाईन येथे असलेल्या सावरकर माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी फ़ैज़ान खान ताहेर खान पठाण याने विघटनशील पदार्थापासून खत निर्मिती करणारा प्रयोग सादर केला. त्याच्या या प्रयोगाला प्रदर्शनीमध्ये प्रथम क्रमांक मिळाला असून यासाठी ५००१ रुपये चे प्रथम बक्षीस व प्रशस्तीपत्र जाहीर झाले आहे. ३० सप्टेंबर २०२२ रोजी प्रदर्शनीमध्ये फ़ैज़ान खान याने सादर केलेल्या प्रयोगाला प्रथम बक्षीस जरी जाहीर झाले असले तरी आतापर्यंत जवळपास तीन आठवडे उलटूनही त्याला अजूनपर्यंत ना बक्षिसाचे वितरण करण्यात आलेले आहे, ना प्रशस्तीपत्र देण्यात आले आहे. या कासव गती नियोजनामुळे इन्तेहा हो गई इंतजार की आयी ना कुछ खबर बक्षीस वितरण की अशी अवस्था झाली आहे. याकडे प्रदर्शनाशी संबंधित अधिकारी व नियोजनकर्ते लक्ष देतील का ? असा प्रश्न उपस्थित होत असून बीड नगर परिषद चे मुख्याधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

Sharing

Visitor Counter