रोजगार मेळावा मध्ये उद्योजकांचा मिळालेला प्रतिसाद चांगला- जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा

रोजगार मेळावा मध्ये उद्योजकांचा मिळालेला प्रतिसाद चांगला- जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा
पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा मध्ये युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती
बीड/वार्ताहर
रोजगार मेळाव्यात बहुतांश अधिसुचित रिक्त पदे हि जिल्हयातील असल्याने जिल्हयातील उमेदवारांना नोकरी करणे सोईचे होईल. जिल्हयात उद्योगांची संख्या कमी आहे. तरी देखील जिल्हयातील उमेदवारांसाठी इतर जिल्हयातील रिक्तपदे उपलब्ध झाले असुन संबंधीत उद्योजकांचा मिळालेला प्रतिसाद चांगला आहे, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा राधाबिनोद शर्मा यांनी असे प्रतिपादन केले.
रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रम जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याप्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते बोलत होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून बीड जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी याकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, बीड व गुरुकुल इंग्लिश स्कुल, बीड यांच्या वतीने पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा बीड येथे गुरुकुल इंग्लिश स्कुलच्या परीसरात संपन्न झाला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, सहायक जिल्हाधिकारी आदित्य जिवने, गुरुकुल इंग्लिश स्कुलचे कार्यकारी संचालक अखिलेश ढाकणे, सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कौशल्य विकास श्री. सुशिल उचले, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी समाधान किरवले, गुरुकुल इंग्लिश स्कुलचे प्राचार्य इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
विचार व्यक्त करताना जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले की, जिल्हयाची ओळख ऊसतोड कामगारांचा जिल्हा अशी आहे. उमेवारांचा मोठया प्रमाणात सहभाग पाहता ज्या उमेदवारांना रोजगार मेळाव्याद्वारे नियुक्ती देण्यात येईल त्यांचा सत्कार पुढे करण्यात यावा असे सांगितले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित बेरोजगार उमेदवारांनी पात्रतेनुसार मुलाखती द्याव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी महोदयांनी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, बीड, सहायक जिल्हाधिकारी आदित्य जिवने यांनी रोजगार मेळाव्याच्या केलेल्या नियोजनाबाबत व युवकांसाठी मार्गदर्शक विचार व्यक्त केले.
यावेळी उपस्थित नियोक्ते व अधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र श्री सुशील उचले यांनी केले. रिक्त पदांसाठी पात्र नोकरी इच्छुक उमेदवार व नियोक्ते या मेळाव्याच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावरआणणे हा या मेळाव्याचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मेळाव्यात सहभागी काही नियोक्ते ऑनलाईन मुलाखती घेणार आहेत असे सांगितले. तसेच काही नियोक्त्यांमार्फत ऑनलाईन टेस्ट व मुलाखती आवश्यक असल्यास पुन्हा होतील असे सांगितले.
सदरील रोजगार मेळाव्यात दुपारपर्यंत सुमारे 350 उमेदवारांनी प्रत्यक्ष नोंदणी केली होती व पुढिल निवडीची प्रक्रिया सुरु आहे. ज्या उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे, परंतु प्रत्यक्ष मुलाखती दिलेल्या नाहीत त्यांच्या मुलाखती ऑनलाईन व टेलीकॉलींगद्वारे होणार आहेत असे आयोजकांनी सांगितले. जवळपास 125 उमेदवारांची प्राथमिक निवड झाली.
सदरील रोजगार मेळावा श्री. सुशिल उचले, सहायक आयुक्त यांच्या मार्गदर्शना खाली यशस्वी संपन्न झाला. तसेच द कुटेग्रुप/ तीरुमला, बीड, जनशिक्षण संस्थान, बीड, महिला आर्थिक विकास महामंडळ, बीड या संस्थांमार्फत व या संस्थांमधील स्वयंसेवकांमार्फत मोलाचे सहकार्य झाले. जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे श्री. राजुकटक, श्री. राहुल दळवी, श्रीमती. शीतल मिसाळ, श्री. जयदत्त इंगोले, श्री. प्रतिक शाह, महात्मा गांधी नॅशनल फेलो, श्री. बाळकृष्ण यादव, श्री. अकील शेख तसेच गुरुकुल इंग्लिश स्कुलचे सर्व अधिकारी-कर्मचारी इत्यादींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.








