पत्रकार बालाजी मारगुडे यांची व्हाईस ऑफ

पत्रकार बालाजी मारगुडे यांची व्हाईस ऑफ
मीडियाच्या राज्य कार्यकारिणीवर निवड
बीड/प्रतिनिधी
दि.2 : येथील पत्रकार तथा दैनिक कार्यारंभचे कार्यकारी संपादक बालाजी अण्णासाहेब मारगुडे यांची ‘व्हाईस ऑफ मीडिया’ या देशपातळीवर कार्यरत असलेल्या पत्रकार संघटनेच्या राज्य कार्यकारिणीवर राज्य कार्यवाहक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी दिली. यापुर्वीच मारगुडे यांच्याकडे बीड जिल्हाध्यक्षपदाची धुरा देखील सोपवलेली आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, आपली पत्रकारितेमधील उज्ज्वल कारकीर्द, काम पाहून आपली पत्रकार संघटनेच्या राज्य कार्यवाहकपदी आम्ही नियुक्ती करत आहोत. ही नियुक्ती करत असताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. आम्हाला आशा आहे की, आपण खूप गतीने काम कराल. पत्रकारांच्या आणि पत्रकारितेच्या सर्वांगीण विकासासाठी आपण काम करणार आहोत. मूल्याधारित पत्रकारिता ही विचारधारा कायम राहावी. ज्या पत्रकारितेच्या जीवावर या सृष्टीचा डोलारा चालतो, ती पत्रकारिता शाबूत राहावी, सुरक्षित राहावी, यासाठीच आपण काम करणार आहोत. आपल्यावर दिलेली जबाबदारी आपण पार पाडाल, ही अपेक्षा आहे.
आपण राज्याची 22 जणांची कार्यकारणी करावी. आपल्या कार्यक्षेत्रात असणार्या सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष नियुक्त करावे. आपण पुढील कामास गती द्यावी, असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे. नियुक्ती पत्रकावर संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुष्पाला यांची देखील स्वाक्षरी आहे. या संघटनेत संस्थापक अध्यक्ष म्हणून सकाळचे संपादक संदीप काळे, राज्य कार्याध्यक्ष म्हणून लोकमतचे संपादक संजय आवटे, राज्याध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार राजा माने, राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून जय महाराष्ट्र चॅनलचे सीईओ चंद्रमोहन पुष्पाला, राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून मीड डेचे संपादक धमेंद्र जोरे, आदी नामवंत पत्रकार, संपादक कार्यकारिणीवर आहेत. बालाजी मारगुडे यांच्या निवडीचे बीड जिल्ह्याच्या पत्रकार वर्तुळातून अभिनंदन होत आहे.








