बनावट कागदपत्र तयार करून नवऱ्याने दिला तलाक !

Beed

बनावट कागदपत्र तयार करून नवऱ्याने दिला तलाक !

पीडीतेचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन

बीड/प्रतिनिधी 

बनावट कागदपत्र तयार करून तलाक झाल्याचे दाखवणाऱ्या नवऱ्याला फसवणूक झालेल्या पीडीतेने तीन वर्षांपासून न्याय मिळत नसल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले असून फसवणूक करणाऱ्या नवऱ्यासह सासू-सासरे, दीर, नणंद व बनावट कागदपत्र तयार करण्यात सामील असलेल्या काजी बदीयोद्दीन ला अटक करून कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि मला न्याय द्या अशी आर्त हाक दिली आहे.

              विवाहित पीडितेने जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, माझे लग्न ५ नोव्हेंबर २०१७ साली बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील सोहिल बशीर इनामदार यांच्यासोबत झालेले आहे परंतु माझ्या नवऱ्याने व सासरच्यांनी मला फक्त पहिली मुलगी जिकरा हिचे जन्म (८ ऑक्टोबर २०१८) होईपर्यंत चांगले नांदवले परंतु मुलगी झाल्यामुळे माझा नवरा, सासू-सासरे, दीर, नणंद या सर्वांनी मिळून माझा शारीरिक, मानसिक व आर्थिक छळ सुरू केला.

            माझ्या वडिलांकडून दोन लाख रुपये आण म्हणून मारहाण करण्यास सुरुवात केली. यामुळे दिनांक ९ ऑगस्ट २०१९ रोजी मी कसेतरी जीव वाचवून वडिलांच्या घरी बीड येथे आले व वडिलांसोबत पुन्हा केज पोलीस ठाण्यात जाऊन केस दाखल केली. यानंतर महिला तक्रार निवारण मंचने माझ्यासह पती व सासरच्यांना बोलावून मला पुन्हा नांदावयास पाठविले. याला दोन-तीन दिवस होत नाही तोच पुन्हा पतीसह सासरच्यांनी शारीरिक, मानसिक व आर्थिक छळ करण्यास सुरुवात केली.

           रमजान ईद निमित्ताने माझ्या पतीने माझ्या वडिलांना फोन करून केजला बोलावले व मला त्यांच्यासोबत घेऊन जाण्यास सांगितले असता कोरोना काळात ज्येष्ठ नागरिकांना एस.टी.मध्ये प्रवेश नाकारण्यात येत असल्याने माझ्या वडिलांनी माझी बहीण व जिजाला माझ्या घरी पाठविले असता मला सासरच्यांनी त्यांच्यासोबत घरातून काढले व पुन्हा मला कधीही नवऱ्यासह सासरच्यांनी ना कधी बोलावले, ना कोणी घेण्यास आले. 

                  आता माझी मुलगी ४ वर्षांची झाली असून आजपर्यंत तिला बापासह माझ्या सासरच्या बाकी मंडळीचे तोंड सुद्धा पाहायला मिळाले नाही. गेल्या ४ वर्षांपासून मी माझ्या माहेरी वृद्ध आई-वडिलांसोबत राहत आहे. मला भाऊ नसल्याने वृद्धावस्थेत वडिलांच्या खांद्यावरच घर प्रपंच चालविण्याची जबाबदारी आहे. ते गल्लोगल्ली फिरून फुगे विकण्याचा व्यवसाय करतात. 

              माझ्या पतीच्या व सासरच्या मंडळींनी माझ्या जीवनात अस्थिरता निर्माण केल्याने न्याय मिळावा म्हणून यापूर्वी दिनांक ११ ऑगस्ट २०१९ रोजी पोलीस ठाण्यामध्ये एन सी आर दाखल केलेला आहे. नंतर दिनांक १० मे २०२२ रोजी पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल केलेला आहे. याला आता तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटूनही पोलीस विभागाकडून माझ्या प्रकरणात अद्याप कोणतीही प्रगती झालेली नाही. वारंवार पोलीस विभागाला तसेच आपल्या सेवेत ही निवेदने दिलेली असून निवेदनाच्या माध्यमातून वेळोवेळी न्याय मागितला आहे परंतु पोलीस प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याने माझे दोषी व समाजावर कलंक असलेला माझा नवरा व सासरची मंडळी उजळ माथ्याने फिरत आहे. 

                  शिवाय वेळोवेळी मला व माझ्या आई-वडिलांना जीवे मारण्याच्या धमक्याही देत आहे. या सर्व बाबी या अगोदर निवेदनाच्या माध्यमातून आपल्या सेवेत मांडल्या आहेत. 

             तरीसुद्धा पोलीस प्रशासनाकडून मला न्याय मिळत नसल्याने माझ्या संसाराचे वाटोळे करणाऱ्या तसेच कायद्याच्या डोळ्यांत धुळफेक करून माझी फसगत केलेल्यांना अटक करून कलम ४२० अंतर्गत न्यायालयात सादर करण्यात यावे. 

              याकरिता दिनांक ७ नोव्हेंबर २०२२, वार - सोमवार पासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर सकाळी १०:०० ते संध्याकाळी ०५:०० वाजेपर्यंत मी व माझे आई-वडीलांनी धरणे आंदोलन सुरू केले असून जोपर्यंत पोलीस प्रशासन माझे पती व माझ्या सासरच्या मंडळींसह काजी व साक्षीदारांना अटक करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करीत नाहीत तोपर्यंत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर दररोज नियमितपणे धरणे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे म्हटले आहे.

Sharing

Visitor Counter