सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांच्या आरोग्यदात्याला मानाचा मुजरा !

सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांच्या आरोग्यदात्याला मानाचा मुजरा !
बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.साबळे यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून हृदयी सत्कार
बीड/प्रतिनिधी
डॉ. सूर्यकांत उर्फ सुरेश साबळे यांची काही दिवसांपूर्वी बीड जिल्हा शल्य चिकित्सक पदी नियुक्ती करण्यात आली. याकरिता शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांनी एकत्र येऊन त्यांना त्यांचीच प्रतिमा असलेले भित्तीचित्र सप्रेम भेट देत फुलहार घालून मोठ्या आत्मियतेने पेढे भरविले. आजपर्यंत सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांवर चांगले उपचार करून डॉ. साबळे यांनी एक उत्कृष्ट आरोग्यदाते म्हणून ओळख मिळविली आहे. या ओळखीशी बांधील राहून त्यांच्या हातून रुग्णांसाठी यापुढेही चांगल्यात चांगले व उत्कृष्ट असे कार्य सतत होत राहावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
डॉ. साबळे यांची कोविड १९ (कोरोना) च्या दुसऱ्या लाटेत दिनांक २० जून २०२१ ला जिल्हा रुग्णालयात प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सकपदी नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून ते दिनांक २१ ऑक्टोबर २०२२ या १ वर्ष ४ महिने आणि ११ दिवस दिवस एवढ्या प्रदीर्घ कालावधीत प्रभारी पद सांभाळताना आपल्या उत्कृष्ट कार्याने जिल्हा रुग्णालयासह जिल्हाभरातील सर्व आरोग्य उपकेंद्रात रुग्णांना चांगले उपचार व चांगली सेवा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले व सध्याही करीत आहेत. तसेच प्रत्येक रुग्णालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना शिस्तीचे पालन करण्यास भाग पाडले व पाडत आहेत. त्यांच्या कर्तव्यदक्षतेची नोंद घेत शासनाने त्यांना प्रभारी ऐवजी पदसिद्ध बीड जिल्हा शल्य चिकित्सकपदी दिनांक २२ ऑक्टोबर २०२२ रोजी नियुक्ती दिली. सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांसाठी आरोग्यदाता ठरलेल्या डॉ. साबळे यांना पदसिद्ध जिल्हा शल्य चिकित्सकपद मिळाल्याने समस्त बीड जिल्हा वासियांमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला आणि अजूनही केला जातोय. अशाच प्रकारे शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे, जमाअ्त ए इस्लामी हिंद चे शहराध्यक्ष सय्यद शफ़ीक़ हाशमी, डॉ. शेख एजाज़ नॅचरोपॅथिस्ट आणि मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ या वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येत डॉ. साबळे यांचा हृदयी सत्कार केला व पदसिद्ध जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून यापुढेही त्यांच्या हातून सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांसाठी चांगल्यात चांगले कार्य व्हावेत अशा सदिच्छा व्यक्त केल्या.








