डीसीपीएसची जमा रक्कम लवकरात लवकर एनएसडीएल कडे पाठवा - आसेफ़ इनामदार

डीसीपीएसची जमा रक्कम लवकरात लवकर एनएसडीएल कडे पाठवा - आसेफ़ इनामदार
अन्यथा महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना खाजगी तीव्र आंदोलन करेल
बीड/प्रतिनिधी
डीसीपीएसची जमा रक्कम एनएसडीएलकडे पाठवण्यात आली नाही. सन २०१४ ते मार्च २०२१ ची एकूण जमा रक्कम एनएसडीएल कडे अजुन फॉरवर्ड करणे बाकी आहे. यामुळे शिक्षकगणात संभ्रम निर्माण होत आहे. जर रक्कम फॉरवर्ड केली असेल तर त्याचे सिलिप सर्व एनपीएस धारक शिक्षकांना तात्काळ देण्यात यावे. आपल्या भविष्य निर्वाह निधीच्या रकमेचा पूर्ण हिशोब शिक्षकांना मिळाला पाहिजे. अन्यथा महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना खाजगी तीव्र आंदोलन करेल असा इशारा जिल्हाध्यक्ष आसिफ इनामदार यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागात प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, ०१ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी शासनाकडुन जुनी पेन्शन योजना बंद करुन डीसीपीएस पेन्शन योजना लागु करण्यात आलेली होती. त्यानुसार शिक्षकांच्या मासिक पगारातून १०% टक्के कपात अनिवार्य केलेली होती. सन २०१४ ते मार्च २०२१ पर्यंत या योजनेअंतर्गत नियमित कपात करण्यात आलेली आहे. तसेच या जमा रकमेवर शासनाचा वाटा म्हणुन १२% टक्के व्याज ही देण्यात आलेले आहे. परंतु मार्च २०२१ पासून राज्य शासनाने डीसीपीएस योजना बंद करुन कर्मचाऱ्यांना एनपीएस योजना लागू केलेली आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी या योजनेमध्ये आपल्या सहखुशीने फार्म भरुन दिले व योजनेला मान्य केले. त्यांच्यासाठी राज्यशासन व एनएसडीएल कडून पीआरएएन नंबर व लॉगिन आयडी देण्यात आलेली आहे. कर्मचारी लॉगिन करुन आपल्या खात्यावरची एकुण रक्कम सहज पाहु शकतात पण असे निदर्शनास आले की, ज्या वेळेस लॉगिन केले तेव्हा एकुण रकमेचा आकडा असमाधानकारक दिसतो. कारण मागील ७ वर्षांची एकुण जमा रक्कम एपीपी मध्ये दिसून येत नाही. जमा रकमेचा आकडा आजपर्यंतच्या एकुण कपाती पेक्षा खुप कमी आहे. याचा जाब वेतन पथक अधिक्षक बीड यांना विचारल्यास त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. नंतर एनएसडीएलशी संपर्क साधला असता त्यांनी म्हटले की, आपण आम्हास फॉरवर्ड केलेल्या रकमेचे चलन नंबर द्यावे. त्या शिवाय आम्ही काहीही करु शकत नाही. आणि चलन नंबर देण्यास वेतन अधिक्षक सुरवसे टाळाटाळ करत आहेत. मग आम्ही काय समजावे ? पुर्ण बीड जिल्ह्यामध्ये जर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची आज पर्यंतची एकुण जमा रकमेची बेरीज केली तर त्याचा आकडा कोट्यावधीत आहे. तरी आपण जिल्हा परिषद च्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी या नात्याने हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अन्यथा महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना खाजगी तीव्र आंदोलन करेल असा इशारा जिल्हाध्यक्ष आसिफ इनामदार यांनी निवेदनातून दिला असून निवेदनावर जिल्हाध्यक्ष आसिफ इनामदार यांच्यासह शेख मोहम्मद मूसा जिल्हा सचिव, शेख अखिल सर, खान शाकीर सर, अब्दुल गफ्फार सर, जागीरदार सर यांची नावे व सह्या आहेत.








