स्वस्त धान्य दुकानावरील मशिन तपासण्यासाठी औरंगाबादचे पथक

स्वस्त धान्य दुकानावरील मशिन तपासण्यासाठी औरंगाबादचे पथक
बीडमधील अनेक स्वस्त धान्य दुकानावर जावून केल्या तपासण्या
बीड। प्रतिनिधी
स्वस्त धान्य दुकानांमार्फत गोरगरीबांसाठी वितरीत केला जात असलेला माल ऑनलाईन पद्धतीने दिला जात असताना नेटवर्क डाऊन होणे या समस्येमुळे एका एका ग्राहकाला अर्ध्या तासापर्यंत थांबण्याची वेळ येत असल्याने नेमक्या यातील त्रृटी पाहण्यासाठी औरंगाबादचे पथक बुधवारी बीडमध्ये दाखल झाले होते. या पथकाने स्वस्त धान्य दुकानांना भेटी देवून युआयडीची तपासणी केली.
गेल्या काही वर्षापासून स्वस्त धान्य दुकानांमार्फत गोरगरीबांसाठी दिले जाणारे धान्य ई-पॉस मशिनच्या माध्यमातून दिले जाते. राशनकार्डवर नोंदी करण्याबरोबरच अंगठा ई-पॉस मशिनने स्विकारला तेव्हाच त्या ग्राहकाला धान्य वितरीत होते. असे असताना नेटवर्क उपलब्ध न होणे या समस्येमुळे स्वस्त धान्य दुकानदारांसह ग्राहकांच्या देखील अडचणी निर्माण होत आहेत. ग्रामीण भागात तर आधीच नेटवर्क उपलब्ध होत नाही त्यात या प्रणालिचे नेेटवर्क डाऊन झाले तर दुष्काळात तेरावा म्हणावे अशीच अवस्था निर्माण होते. याच दृष्टीकोनातून बुधवारी औरंगाबादमधील पुरवठा विभागाचे एक पथक बीडमध्ये दाखल झाले होते. या पथकाने बीडमधील वेगवेगळ्या स्वस्त धान्य दुकानांवर जावून युआयडी चेक केले.








