वंचितच्या अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश ही बातमी दिशाभूल करणारी-ॲड. संजय रोडे

वंचितच्या अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश ही बातमी दिशाभूल करणारी-ॲड. संजय रोडे
परळी/प्रतिनिधी
सिरसाळा येथील वंचित बहुजन आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश ही बातमी जनतेची दिशाभूल करणारी असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा सहसचिव ॲड. संजय रोडे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, परळी तालुक्यातील सिरसाळा येथील वंचित बहुजन आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याची बातमी ही सर्वत्र सोशल मीडियावर व वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली आहे. ही बातमी धादांत खोटी असून पक्षप्रवेश केलेले प्रमोद किरवले, गफार शेख व गोविंद चोपडे यांचा आणि वंचित बहुजन आघाडीचा कसलाही संबंध नसून ते पक्षाचे प्राथमिक सदस्य ही नाहीत. यापूर्वीही ते वंचित बहुजन आघाडीचे कोणतेही पदाधिकारी अथवा सदस्य नव्हते, आताही नाहीत व पुढे ते किती पक्ष बदलतील याची माहिती आमचेकडे नाही.
सध्या ग्रामपंचायत निवडणूक लागली असल्याने परळी तालुक्यात वंचित बहुजन आघाडीने सर्वत्र आपले पॅनल उभे केले असल्याने प्रस्थापित राजकीय पक्षांना धास्ती बसली आहे. यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी ही धादांत खोटी बातमी प्रसारित करण्यात आलेली आहे.
तरी मतदार बंधू आणि भगिनींनी याबाबतीत कसलाही संभ्रम न बाळगता वंचित बहुजन आघाडीच्या पॅनल मधील सर्व उमेदवारांना मतदान करून मोठ्या बहुमताने निवडून देण्याचे आवाहन ही वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा सहसचिव ॲड. संजय रोडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.








