चांगले विद्यार्थी व खेळाडू घडविण्यासाठी त्यांना दर्जेदार शिक्षण व खेळ शिकवा !

चांगले विद्यार्थी व खेळाडू घडविण्यासाठी त्यांना दर्जेदार शिक्षण व खेळ शिकवा !
वेगवेगळ्या स्पर्धेच्या नावाने पैसे उकडू नका - एस.एम.युसूफ़
बीड/प्रतिनिधी
समाजात वाढलेल्या स्पर्धेमुळे प्रत्येक क्षेत्रात एक प्रकारची असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. याचाच फायदा उचलत काही डोमकावळे वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून पैसे उकडून स्वतःच्या तुंबड्या भरत असल्याचे दिसून येते. याला शिक्षण क्षेत्र व खेळाचे क्षेत्रही अपवाद राहिले नसल्याचे मुक्तपत्रकार तथा शिक्षणमित्र एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले असून शिक्षक व प्रशिक्षकांना जर खरेच विद्यार्थी आणि खेळाडूंना चांगले घडवायचे असेल तर त्यांना दर्जेदार शिक्षण व खेळ शिकवा वेगवेगळ्या स्पर्धेच्या नावाने पैसे उकडून स्वतःच्या तुंबड्या भरणाऱ्या डोमकावळ्यांच्या नादी लावू नका असे कळकळीचे आवाहन केले आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, वाढती महागाई, वाढती जनसंख्या, जनसंख्येच्या मानाने उपलब्ध नसलेले उद्योग व अत्यंत कमी प्रमाणात असलेल्या नोकऱ्या यामुळे समाजात मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढली आहे तसेच असुरक्षिततेची भावना ही निर्माण झाली आहे. ही बाब हेरून समाजात वावरणारे काही डोमकावळे या स्थितीचा गैरफायदा घेत वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून शिक्षणक्षेत्र व खेळाच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या स्पर्धेच्या नावाने पैसे उकडून स्वतःच्या तुंबड्या भरू लागले आहेत. यामुळे महागाई व स्पर्धेच्या या युगात सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थ्यांच्या व खेळाडूंच्या पालकांना एक तर अशा उपटसुंभांच्या लुटीला बळी पडावे लागत आहे नाहीतर आपल्या पाल्यांना पैशांअभावी चांगले शिक्षण व दर्जेदार खेळांपासून वंचित ठेवावे लागत आहे.
शासन-प्रशासन दरबारी कवडीची किंमत नसलेल्या खाजगी क्षेत्रातील अनेकांनी एका पेपरसाठी चक्क ५० ते १०० रुपये फी आकारून परीक्षा घेण्याचा सपाटा सुरू केला आहे. यात ते हजारो विद्यार्थ्यांना गुरफटून घेत लाखोंची लूट करीत आहेत. या परीक्षा ते विनामूल्य किंवा नाममात्र फी मध्ये का घेत नाहीत ? जर कोणी हरकत घेतली तर हरकत घेणाऱ्याला अशा परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचे सामान्यज्ञान वाढते व त्याला पुढे याचा लाभ होतो असे कारण दिले जाते. वास्तविक पाहता विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या शाळेत अधिकृतरित्या वर्षातून चार चाचणी परीक्षा, सहामाही परीक्षा व वार्षिक परीक्षा घेण्यात येतातच ना. मग अशा खाजगी लोकांच्या परीक्षांचा काय उपयोग ? हा साधा प्रश्न सुद्धा वाढत्या स्पर्धेमुळे पालकांच्या लक्षात येत नसल्याने त्यांचा मोठ्या प्रमाणात मामा बनू लागला आहे.
अशीच अवस्था खेळाच्या क्षेत्रात सुद्धा दिसून येते. विविध खेळांच्या स्पर्धा भरविण्यात येतात. यात खेळात तरबेज असलेले खेळाडू तर सहभागी होतातच परंतु आर्थिक उलाढाली पायी प्रशिक्षक आणि अशा स्पर्धांचे आयोजन करणारे लोक ज्या खेळाडूंना ते खेळत असलेल्या खेळात सामील होऊन साधे आठ-दहा दिवस होत नाही तोच अशा नवख्यांना सुद्धा वेगवेगळी आमिषे दाखवून स्पर्धेत सामील होण्यासाठी प्रत्येकी २०० ते ५०० रुपये भरायला लावून स्पर्धेत सामील करून घेताना दिसतात. येथेही नवखे खेळाडू व त्यांच्या पालकांना प्रशिक्षक व आयोजकांकडून चक्क मामा बनविले जात आहे. या प्रकारावर जर कोणी आक्षेप घेतला तर वेगवेगळे खेळ शिकविणारे प्रशिक्षक आणि आयोजक मिळून अशा स्पर्धेमध्ये भाग घेऊन तुमच्या पाल्यांचा हुरूप वाढेल, ते त्याला खेळात पुढे नेण्यासाठी कामी येईल असे सांगून बोळवण करीत आहेत. नवख्या खेळाडूंना स्पर्धेत सामील करण्यापूर्वी या मायबाप प्रशिक्षकांनी खेळात चांगले प्रशिक्षण देऊन दर्जेदार खेळाडू बनविणे अपेक्षित असताना फक्त स्वत:चे आर्थिक लाभ डोळ्यांसमोर ठेवून कच्चे लिंबू असलेल्या खेळाडूंना स्पर्धेत उतरवित असल्याचे विदारक चित्र समाजामध्ये दिसत आहे.
स्पर्धा परीक्षा असो की खेळांच्या स्पर्धा, खाजगी क्षेत्रातील लोकांना जर या घ्यायच्याच असतील तर त्या असे पैसे उकळणाऱ्या डोमकावळ्यांऐवजी समाजातील दानशुरांनी पुढे येऊन त्या निशुल्क आयोजित करायला हव्यात. तेव्हाच खरे उत्कृष्ट विद्यार्थी व दर्जेदार खेळाडू घडविण्यासाठी घेतल्या जातील व याचा लाभही समाजातील तळागाळात वसलेल्या सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थी व खेळाडूंना होईल परंतु सध्यातरी समाजात वावरत असलेले अनेक डोमकावळे विद्यार्थी व खेळाडूंचे भले सांगून यातून अक्षरशः लाखो रुपयांची लुट करीत आहेत. याला आळा बसायला हवा.
संबंधित शासकीय-प्रशासकीय यंत्रणेने अशा खाजगी उपटसुंभांकडे लक्ष देऊन पालक, विद्यार्थी व खेळाडूंची होत असलेली आर्थिक लूट थांबवावी तसेच शिक्षक, प्रशिक्षक यांना जर खरेच चांगले विद्यार्थी व खेळाडू घडवायचे असतील तर त्यांनी दर्जेदार शिक्षण व खेळ शिकवावे. वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून स्पर्धेच्या नावाने पैसे उकळत आर्थिक लूट करून स्वतःच्या तुंबड्या भरणाऱ्या डोमकावळ्यांच्या नादी विद्यार्थी व खेळाडूंना लावू नये असे कळकळीचे आवाहन मुक्तपत्रकार तथा शिक्षणमित्र एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.








