महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना (खाजगी) जि.शा.बीड च्या मागणीला यश

महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना (खाजगी) जि.शा.बीड च्या मागणीला यश
प्राथमिक शिक्षकांच्या अंशदान निवृत्ती वेतनाच्या रकमेचा प्रश्न मार्गी लागणार - आसिफ इनामदार
बीड/प्रतिनिधी
प्राथमिक शिक्षकांच्या अंशदान निवृत्ती वेतनासाठी शिक्षकांच्या वेतनातून दरमहा १०% कपात करण्यात येणारी रक्कम सन २०१४ ते मार्च २०२१ पर्यंत नियमितपणे कपात करूनही शिक्षकांच्या खात्यावर आजपर्यंत जमा करण्यात आली नव्हती. याबाबत महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना (खाजगी) जि.शा. चे बीड जिल्हाध्यक्ष आसिफ इनामदार यांनी आवाज उठवत शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत निवेदनाद्वारे तक्रार करून याकडे लक्ष वेधले असता शासनाने याविषयी ७ डिसेंबर २०२२ रोजी परिपत्रक काढून येत्या ३१ डिसेंबर पर्यंत याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेशित केल्याने संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष आसिफ इनामदार यांच्या प्रयत्नास यश आले असून गेल्या अनेक वर्षांपासून प्राथमिक शिक्षकांच्या अंशदान निवृत्ती वेतनाचा प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागणार असल्याचे आसिफ इनामदार यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेतून राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत समाविष्ट करण्याची कार्यपद्धती शासन निर्णयानुसार दिनांक १९ सप्टेंबर २०१९ अन्वये विहित करण्यात आलेली आहे. मात्र शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली जमा रक्कम एनएसडीएल कडे पाठवण्यात आलेली नाही. यामुळे शासनाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून याचे हिशोब तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहे. दिनांक ७ डिसेंबर २०२२ रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेली रक्कम संबंधितांच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन खात्यावर जमा करण्याची कार्यवाही डिसेंबर २०२२ मध्ये पूर्ण करण्यात यावी असे निर्देश देण्यात आले असून सदर कार्यवाही ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात आले नाही तर शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल असे निर्देश देण्यात आल्याचे शासनाने काढलेल्या परिपत्रकात नमूद केले असल्याने आता लवकरच प्राथमिक शिक्षकांच्या अंशदान निवृत्ती वेतनाच्या रकमेचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना (खाजगी) जि.शा. चे बीड जिल्हाध्यक्ष आसिफ इनामदार यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.








