संथ व त्रासदायक कामामुळे खलनायक रंजीत ची आठवण !

संथ व त्रासदायक कामामुळे खलनायक रंजीत ची आठवण !
आमदार व मुख्याधिकारी यांनी नायक बनून यावे - एस.एम.युसूफ़
बीड/प्रतिनिधी
शहरातील आसेफ़नगर चा मुख्य रस्ता, नाली व मोठ्या अगडबंब नाल्याचे काम सुरू होऊन आता दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. तरीसुद्धा रस्त्याच्या एका बाजूची नालीही अजून पूर्ण बांधण्यात आली नाही. रस्ता व मोठा नाला पूर्ण व्हायला अजून किती महिने लागतील ? असा प्रश्न येथील संथ व त्रासदायक कामाकडे पाहून जनतेतून होऊ लागला. त्रासदायक कामामुळे लोकांना हिंदी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम खलनायक रंजीत यांची आठवण येऊ लागली असून काम चांगल्या गुणवत्तेचे आणि गतीने पूर्ण करण्यासाठी आता आमदार संदीप क्षीरसागर आणि बीड नगर परिषद चे मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी नायक होऊन पुढे यावे अशी मागणी होऊ लागली असल्याचे मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, आसेफ़नगरचा मुख्य रस्ता हा अत्यंत वर्दळीचा व २४ तास वाहणारा आहे परंतु याकडे पाहायचे गांभीर्य लोकप्रतिनिधी आणि बीड नगर परिषद ला नसल्याने गेल्या ३० वर्षांपासून हा रस्ता व जवळपास चार किलोमीटर लांबून वाहत येणारा येथील मोठा अगडबंब नाला खितपत पडला होता. याकडे लक्ष वेधण्यासाठी सन २०१४ पासून बीड नगर परिषद प्रशासन व जिल्हा प्रशासनाचे निवेदनांच्या माध्यमातून, आंदोलनांच्या माध्यमातून वेळोवेळी लक्ष वेधण्यात आले. येथे स्थानिक नागरिकांनी मिळून रस्ता व नाल्यावर दोनदा पान फुल-वहा आंदोलन केले तर एकदा निषेध आंदोलन केले. तेव्हा कुठे दीड महिन्यापूर्वी कामाला सुरुवात झाली परंतु अत्यंत संथ व त्रासदायक गतीने चालणाऱ्या कामाकडे पहा आणि पान-फुल वहा अशा पद्धतीने करण्यात आलेली असल्याने हे काम खरेच जनतेच्या सोयीसाठी करण्यात येऊ लागले की त्रास देण्यासाठी ? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. जसे हिंदी चित्रपट सृष्टीतील खलनायक रंजीत हा पडद्यावर आला की कुणा ना कुणाला त्रास देण्याचे काम करत असायचा असाच त्रास गेल्या दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून सोसणाऱ्या नागरिकांना खलनायक रंजीत ची आठवण येऊ लागली असून यापासून वाचविण्यासाठी आता आमदार संदीप क्षीरसागर व मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी नायक होऊन पुढे यावे अशी मागणी होऊ लागली असल्याचे मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.








