निवडणूक यंत्रणेतील अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

निवडणूक यंत्रणेतील अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न
निवडणूक प्रक्रिया गांभीर्याने व काळजीपूर्वक राबवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
बीड/वार्ताहर
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघातील निवडणूकीच्या अनुषंगाने आचारसंहितेची अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात येत आहे. जिल्ह्यातील 34 मतदान केंद्रांवर 30 जानेवारी 2023 रोजी मतदान प्रक्रिया होणार असून सदर मतदान मतपत्रिका व पसंतीक्रम द्वारे होणार आहे. मतमोजणी 2 फेब्रुवारी 2023 रोजी औरंगाबाद येथे होणार आहे. या अनुषंगाने जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांच्या उपस्थितीत मतदान प्रक्रियेतील नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे पहिले जिल्हास्तरीय प्रशिक्षण आज संपन्न झाले. यावेळी निवडणूक प्रक्रिया गांभीर्याने व काळजीपूर्वक राबवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात झालेल्या प्रशिक्षणासाठी आज अपर जिल्हाधिकारी (बीड) उत्तम पाटील, अपर जिल्हाधिकारी (अंबाजोगाई ) सुनील यादव, प्रभारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संतोष राऊत, उपजिल्हाधिकारी दयानंद जगताप व सर्व उपविभागीय अधिकारी, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार तसेच संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
आज झालेले अधिकारी कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण प्रसंगी मतदान प्रक्रियेतील कामकाजाबाबत तपशीलवार माहिती देण्यात आली. सदर मतदान हे मतपत्रिकाव्दारे होणार असून पसंती क्रमाने करावयाचे मतदान याची पद्धती, मतपेट्या, स्ट्रॉंग रूमचे नियोजन आदी अनुषंगाने सूचना देण्यात आल्या. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी त्यांचे सहाय्यक अधिकारी यांच्या नियुक्ती अनुषंगाने घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देण्यात आली. निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने एकूण तीन प्रशिक्षण होणार असून शेवटचे अंतिम प्रशिक्षण संबंधित तालुक्यात होणार आहे.








