घटनेमागील कारणे शोधल्याशिवाय पत्रकारिता प्रगल्भ होत नाही

Beed

घटनेमागील कारणे शोधल्याशिवाय पत्रकारिता प्रगल्भ होत नाही

-ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब यांचे प्रतिपादन

-व्हॉईस ऑफ मीडियाकडून सेवानिवृत्त पत्रकार जगदीश पिंगळे, रवींद्र देशमुख, दगडू पुरी यांचा सन्मान

प्रतिनिधी/बीड

दि.25 ः सिलिंगसारख्या जाचक कायद्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. दरदिवशी शेतकरी आत्महत्या घडत आहेत. तोकडी जमीन, अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे शेतकरी आत्महत्या होतच राहतात. आत्महत्येची निमित्ते चर्चिली जातात. परंतु, कारणे शोधली जात नाहीत. याकडे माध्यमांनी लक्ष द्यायला हवे. पत्रकारांनी घटनेमागची कारणे शोधल्याशिवाय पत्रकारिता प्रगल्भ होत नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यिक अमर हबीब यांनी केले.

व्हॉईस ऑफ मीडियाच्या बीड जिल्हा शाखेकडून दर्पण दिनाचे औचित्य साधून सेवानिवृत्त पत्रकारांचा सन्मान सोहळा सोमवारी (दि.9) आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अमर हबीब हे बोलत होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून दैनिक कार्यारंभचे संपादक शिवाजीराव रांजवण, व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य उपाध्यक्ष संजय मालाणी, राज्य कार्यवाहक तथा जिल्हाध्यक्ष बालाजी मारगुडे, जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश लिंबेकर यांच्यासह सत्कारमुर्ती ज्येष्ठ पत्रकारांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते सेवानिवृत्त पत्रकार जगदीश पिंगळे, रवींद्र देशमुख, दगडू पुरी यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

अमर हबीब म्हणाले, आपण बीडमध्ये पत्रकारितेचे प्राथमिक धडे घेतले. स्वकर्तृत्वावर पत्रकारिता करण्याची जिद्द घेऊन घराबाहेर पडलो. गावाबाहेर पडल्याशिवाय गुणांना उजाळा मिळत नाही. पत्रकारांची मुले चांगली घडतात, त्यामुळे एकही पत्रकार वृद्धाश्रमात दिसणार नाही. हे सुद्धा पत्रकारितेचे फलित आहे. वृद्धांचा आदर करावा, असा संदेश आजच्या कार्यक्रमातून दिला गेला. वृद्धांना आदर करणे गरजेचे आहे. अशा कार्यक्रमातून ज्येष्ठ पत्रकारांना ऊर्जा मिळते. पत्रकारिता ही एक कला आहे. ती उपजत असावी लागते. असे पत्रकार दुर्मिळ आहेत. त्यांची देखील समाजाने कदर करायला हवी. नसता कलाकारांची समाजात कायम अवहेलनाच होत आली आहे. सर्व समाजघटकात स्त्री आणि शेतकरी वर्गाची अवस्था दयनीय आहे. बेनामी संपत्ती लपविण्यासाठी शेतीचा आधार घेतला जातोय. खर्‍या शेतकर्‍याला आज शेती परवडते का? आणि कृषी भूषण होता येते का? असा सवाल करत त्याला सक्तीने शेती करावी लागते हे नमूद केले. परंतु याविरूद्ध पत्रकारितेत तसे घडत नाही. पत्रकार स्वइच्छेने या क्षेत्रात येतात. त्यामुळे स्वतःहून आलात तर यातना सहन करण्याची मानसिकता ठेवा आणि सर्जनशीलता अंगीकारावी, असा सल्ला त्यांनी दिला. अलिकडे ज्येष्ठ मंडळींवरच नवीन पिढीचे जग समजून घेण्याची वेळ आली आहे. तरुण शब्दात, प्रौढ वाक्यात तर ज्येष्ठ पॅरेग्राफमध्ये बोलतात, कारण त्यांच्याकडे अनुभवाचे संचित असते. ज्येष्ठांनी पुन्हा एकदा लिखाणाकडे वळावे. नव्या साधनांचा वापर करावा. आता वृत्तपत्रे व्यवसायिकतेकडे वळली आहेत. असे असले तरी पत्रकारांनी त्यांची लेखणी कष्टकरी वर्गासाठी झिजवावी. बीड जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकारांनी शेतकरी वर्गाशी कधीही प्रतारणा केली नाही, हा गुण अनुकरणीय आहे, अशा शब्दात कौतूक केले. कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी देखील आवर्जून उपस्थिती लावली. यावेळी संपादक शिवाजीराव रांजवण, रविंद्र देशमुख, जगदीश पिंगळे आदींनी मनोगत व्यक्त केले. सत्कारमुर्तींचा परिचय राज्य उपाध्यक्ष संजय मालाणी यांनी करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य कार्यवाहक तथा बीड जिल्हाध्यक्ष बालाजी मारगुडे तर सूत्रसंचलन प्रवक्ते गणेश सावंत रांजणीकर यांनी केले. आभार जिल्हा सरचिटणीस प्रभात बुडूख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा उपाध्यक्ष जालींदर धांडे, विनोद जिरे, सहसरचिटणीस सुनील यादव, कार्यवाहक उदय नागरगोजे, केशव कदम, संघटक अमोल मुळे, ज्ञानेश्वर वायबसे, प्रसिध्दी प्रमुख शुभम खाडे, सदस्य संजय तिपाले, शिरीष शिंदे, मुकेश झणझणे, धनंजय जोगडे, सिद्दीक इनामदार, श्रीराम आगे आदींनी प्रयत्न केले. यावेळी राजकीय, सामाजिक, प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

 

ज्येष्ठ पत्रकार हा आपल्यासाठी ठेवा -शिवाजीराव रांजवण

बीड जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार हा आपल्यासाठी ठेवा आहे. त्यांना सन्मान माझ्या हातून होणे ही गौरवास्पद बाब आहे. संघटनेने मालक, संपादकांचे प्रश्न सुद्धा व्हॉईस ऑफ मीडियाने वरीष्ठ पातळीवर मांडावेत. पत्रकारांच्या आरोग्य समस्येवर येथे उपस्थित असलेल्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी लक्ष घालून पत्रकारांना हॉस्पिटल शुल्कात सवलत द्यायला हवी, असे मत व्यक्त केले.

 

शेतकरी समृद्ध होण्यासाठी प्रयत्नशील-रवींद्र देशमुख

मीडियापर्यंत पोहचू न शकलेल्या वर्गासाठी आपण काम केले. शेती-सहकार पुरवणीत हजारो शेतकर्‍यांच्या यशोगाथा मांडल्या. सकारात्मक पत्रकारिता करण्याचा प्रयत्न केला. कृषी पत्रकारितेत योगदान देतानाच मी स्वतःही शेतीत प्रयोग केले. शेतीतून शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी कायम प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन सत्कारमुर्ती रवींद्र देशमुख यांनी केले.

 

पत्रकारितेसाठी अभ्यास गरजेचा-जगदीश पिंगळे

माध्यम क्षेत्र हे खुले आहे. यातील स्वरूप बदलले आहे. काळानुसार पत्रकारांनी बदलणे करणे गरजेचे आहे. पत्रकारितेसाठी अभ्यास गरजेचा असून नवख्यांनी पूर्ण क्षमतेने झोकून देण्याची गरज आहे, असे मत सत्कारमुर्ती ज्येष्ठ पत्रकार जगदीश पिंगळे यांनी केले. आपण तळागाळातील वर्गासाठी पत्रकारिता केली हे नमूद करतानाच त्यांनी पत्रकारितेतील अनुभव मांडला.

Sharing

Visitor Counter