मल्टीपर्पज ग्राउंड मधल्या ओपन जिमची अवस्था बिकट; नेत्यांचे दुर्लक्ष!

मल्टीपर्पज ग्राउंड मधल्या ओपन जिमची अवस्था बिकट; नेत्यांचे दुर्लक्ष!
बीड/प्रतिनिधी
शहरातील छत्रपती संभाजी राजे महाराज क्रिडा संकुल (मल्टीपर्पज ग्राऊंड) मध्ये बसवण्यात आलेल्या ओपन जीमची अवघ्या 25 दिवसांत वाटोळे झाले आहे. ओपन जीमचे सर्व साहित्य जवळपास उखडले आहे. काही साहित्य तुटून पडले आहे. त्यामुळे व्यायामासाठी येणार्या नागरीकांना, महिलांना जखम होवु लागली आहे. काही दिवसांपुर्वी आ.संदीपभैय्या क्षीरसागर यांनी भल्या पहाटे क्रिडा संकुलाला भेट देवुन ओपन जीमचे काम तात्काळ सुरू करण्याच्या सुचना दिल्या होत्या. मात्र आ.संदीपभैय्यांनी पाठ फिरवताच ओपन जीमचे काम करणार्या विधी इन्टरप्रायजेस या नागपुरच्या एजन्सीने थातुर-मातूर काम केले. त्यावर 4 लाख रूपयांचा खर्च केला. ओपन जीमचे प्रत्येक साहित्य बसवतांना सिमेंट ओटा करून त्यावर ते साहित्य कंपनीच्या व्यक्तीमार्फत बसविणे गरजेचे होते. मात्र विधी इन्टरप्रायजेसने पेवर ब्लॉकच्या दोन-दोन फरशा काढुन खड्डा केला आणि त्यामध्ये साहित्य रोवले. दि.21 डिसेंबर 2022 रोजी ओपन जीमचे 13 साहित्य बसवले त्यापैकी 7 साहित्य तुटले आहेत तर इतर साहित्य जमिनीपासुनच उखडले गेले आहेत. दोन दिवसापुर्वी एका लहान मुलाच्या बोटाला गंभीर दुखापत झाली तर अन्य एक महिला जीम मारतांना खाली पडुन जखमी झाली. विधी इन्टरप्रायजेसने 4 लाखाचा चुराडा करून बीडकरांच्या डोळ्यात धुळफेक केली आहे. यामुळे नागरीकांकडून पालिकेचा कारभार आणि संबंधीत एजन्सीविरूध्द संताप व्यक्त होत आहे.
सीओ अंधारे मॅडम, एकदा भेट द्याच !
बीड शहरातील छत्रपती संभाजी राजे क्रिडा संकुलावर सकाळ संध्याकाळ नागरीक व्यायामासाठी, वॉकिंगसाठी गर्दी करतात मात्र याठिकाणच्या ओपन जीमचे वाटोळे झाल्याने नागरीकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. क्रिडा संकुलात सर्वत्र धुळच धुळ झाली आहे. कधी-कधी रात्रीच्या वेळी वीज पुरवठा सुध्दा बंद असतो. विधी इन्टरप्रायजेसने 4 लाखांचा केलेला खर्च मातीत मिळाला असुन या संदर्भात सीओ निता अंधारे मॅडम यांनी एकदा क्रिडा संकुलाला प्रत्यक्ष भेट द्यावी आणि तेथील असुविधांची दखल घ्यावी.








