स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी;व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीला 24 तासांत अटक

स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी;व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीला 24 तासांत अटक
बीड प्रतिनीधी
अंबाजोगाई शहरात एका व्यापाऱ्याला कोयत्याने वार करून लुटणाऱ्या तीन जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा, बीडच्या पथकाने अवघ्या 24 तासांत जेरबंद केले.दिनांक 15 जानेवारी रोजी रात्री 9 वाजता, सुजित श्रीकृष्ण सोनी (रा. ओमशांती कॉलनी, अंबाजोगाई) हे रेस्ट हाऊसजवळून जात असताना अज्ञात आरोपींनी कोयत्याने त्यांच्या डोक्यावर व हातावर वार करत सोन्याची अंगठी आणि मोबाईल हिसकावून पळ काढला. या प्रकरणी अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. गुप्त माहितीच्या आधारे तेजस तुरुकमारे (रा. स्नेहनगर, अंबाजोगाई), कृष्णा दत्ता मुंडे (रा. राजीव गांधी चौक, अंबाजोगाई) आणि एका अल्पवयीन मुलाला शासकीय विश्रामगृहाजवळ विनानंबरच्या मोटारसायकलसह ताब्यात घेण्यात आले होते त्यांची चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. फिर्यादी व्यापाऱ्याबद्दलची माहिती त्यांच्याच दुकानातील कामगार अनिकेत मगर याने पुरवली होती. व्यापाऱ्याची नेहमी स्कुटीमध्ये पैसे ठेवण्याची सवय असल्याचे त्याने सांगितले होते. 15 जानेवारी रोजी अनिकेतने व्यापारी दुकान बंद करून स्कुटीवरून निघाल्याची माहिती दिली. त्यानंतर आरोपींनी त्यांचा पाठलाग करून व्यापाऱ्याला रेस्ट हाऊसजवळ अडवले व कोयत्याने हल्ला करत लुटमार केली होती.आरोपींकडून 6 ग्रॅमची सोन्याची अंगठी, वन प्लस कंपनीचा मोबाईल आणि विनानंबरची यमाहा स्पोर्ट्स बाईक असा एकूण 1,13,760 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कामगिरीत पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस हवालदार मारुती कांबळे, बाळकृष्ण जायभाये, राजू पठाण, विकास राठोड, विष्णू सानप, सचिन आंधळे, अश्विनकुमार सुरवसे, चालक नितीन वडमारे यांनी सहभाग घेतला.अंबाजोगाई पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.








