ज्ञानराधा मल्टीस्टेट सोसायटीवर ६८४ कोटींची फसवणूक प्रकरण; ८० मालमत्तांचा MPID प्रस्ताव पाठवला

ज्ञानराधा मल्टीस्टेट सोसायटीवर ६८४ कोटींची फसवणूक प्रकरण; ८० मालमत्तांचा MPID प्रस्ताव पाठवला
बीड प्रतिनीधी
बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीविरुद्ध दाखल फसवणूक प्रकरणाची चौकशी पुढे जात असून, आरोपींच्या स्थावर व जंगम मालमत्तांवर MPID कायद्यांतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव मुंबईतील अपर पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे.ज्ञानराधा मल्टीस्टेटची बीड जिल्ह्यात २३ शाखा असून, विविध पोलीस ठाण्यांमध्ये ६३ गुन्हे दाखल झाले आहेत. तपासात आतापर्यंत ११२११ ठेवीदारांची ६३६ कोटी २६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. या तक्रारींच्या आधारे एकूण ६८४ कोटी ७८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तपासादरम्यान आरोपींच्या मालकीच्या ८० स्थावर मालमत्तांची माहिती नोंदणी कार्यालय व इतर ठिकाणांहून गोळा करण्यात आली आहे. तसेच २५६ बँक खाती निष्पन्न करण्यात आली असून, त्यापैकी ४४ बँक खाती गोठवण्यात आली आहेत. या खात्यांमध्ये ६९ लाख २८ हजार रुपयांची रक्कम फ्रीज करण्यात आली आहे.आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत ३२.८० लाख रुपयांचे मुद्देमाल, ६.३४ लाख रुपयांची रोख रक्कम, ७३ ग्रॅम सोने, २५० ग्रॅम चांदी आणि अन्य महत्त्वाचे दस्तऐवज जप्त केले आहेत.सदर तपास आणि कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी MPID प्रस्ताव सादर करण्यात आला असून, फसवणुकीच्या तपासात दिवसेंदिवस नवनवीन माहिती समोर येत आहे.








